नंदुरबार – आगामी सणासुदीच्या दिवसात पैसे मिळावेत म्हणून केळी आणि पपईची बाग फुलवली. बाग चांगली यावी म्हणून जे करावे ते सर्व केले. त्यासाठी १५ ते २० लाख रुपयांचा खर्च केला. हातात पैसे येतील म्हणून घरात सर्वच आनंदी होते. परंतु, निसर्गाला हा आनंद पाहवला नसावा. शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. आणि सर्व होत्याचे नव्हते. झाले. डोळ्यां देखत केळी आणि पपईची बाग आडवी झाली. आता काय करावे, कसे जगावे…

शनिवार आणि रविवार या दोन दिवशी उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले. शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पिकांची माती झाली. नंदुरबार जिल्ह्यातील चौपाळे शिवार हे त्यापैकीच एक. या शिवारातील प्रगतशील शेतकरी बाजीराव माळी यांनी मोट्या कष्टाने जपलेली पपई आणि केळी बाग शनिवारच्या वादळी पावसाने उद्ध्वस्त केली.

आपली व्यथा मांडताना त्यांच्या डोळ्यांमध्ये नकळत अश्रु उभे राहिले. शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी तेवढे अश्रु पुरेसे असेच म्हणावे लागेल. अर्थात बाजीराव माळी यांच्या सारखी अवस्था नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची आहे. अवघ्या महिन्याभरावर तोड असलेली केळी आणि पपईची झाडे या वादळी वाऱ्यात तुटून पडल्याचे दिसून आले. आपली अवस्था सांगावी कोणाला, मदत तरी कोण आणि किती करणार, असा प्रश्न शेतकर्‍यांना आहे. शनिवारी सायंकाळनंतर अर्धा तास झालेल्या वादळी पावसाने नंदुरबार आणि काही मंडळात पिकांचे मोठे नुकसान केले.

रविवार उजाडल्या नंतर नंदुरबार आणि इतर मंडळातील शेतकऱ्यांचे शनिवारच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहून सारेच अवाक झाले. सकाळच्या सत्रात पंचनाम्यासाठी तलाठी यांना संपर्क केला असता महिला तलाठी वैद्यकीय रजेवर असल्याचे सांगण्यात आले. त्यांचा प्रभार ज्यांच्याकडे सोपवण्यात आला होता, ते प्रभारी तलाठीही उपचारासाठी बाहेर गावी असल्याने पंचनामे कोण करणार, असा प्रश्न शेककऱ्यांना पडला. त्यामुळे नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बांधावर पोहचलेले तहसीलदार प्रदीप पवार यांच्या वरच शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

काहींनी व्यथा मांडतांना अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करण्याच्या सरकारी उत्तरांविषयी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत हात जोडले. तहसीलदारांनी शेतकऱ्यांना धीर देत तातडीने पंचनामे करुन संबंधीत तलाठ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे सुचित केले.

पावसाने मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडले असून वाहनांवर वृक्ष पडून मोठे नुकसान झाले असल्याचे यावेळी तहसीलदार पवार यांनी सांगितले. पंचनामे लवकरात लवकर करुन शासनाकडे नुकसान भरपाईसाठी पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबार तालुक्यातील कोपर्लीसह ओसर्ली, अमळथे, होळ शिवारात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले.