नंदुरबार: ईदनिमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक झाल्यानंतर शहराच्या विविध भागात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करुन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत परिस्थिती नियंत्रणात आणली. नंदुरबारमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. इतर शहरांमधूनही अतिरिक्त कुमक मागवण्यात आली.

शहरातून ईदनिमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील काही जण माळीवाडा परिसरात असताना दोन गटांमध्ये दगडफेक सुरु झाली. त्याचे लोण शहरातील इतर भागातही पसरले. माळीवाडा, भद्राचौक, काळी मस्जिद भागात दगडफेकीमुळे अधिक नुकसान झाले. अनेक दुचाकींची तोडफोड करण्यात आली. चार घरांना आग लावण्याचा प्रयत्न झाला. पोलीस अधीक्षकांसह एका पोलीस वाहनाच्या काचा दगडफेकीत फुटल्या. दोन पोलीस कर्मचारी वगळता दगडफेकीत कोणी जखमी झाले नाही.

हे ही वाचा…नाशिक : मुकेश शहाणे धमकी प्रकरणी गुन्हा दाखल       

दरम्यान, शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस. यांनी केले आहे. समाज माध्यमातून कुठल्या प्रकारच्या चिथावणीखोर चित्रफिती प्रसारित केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.