जळगाव : शहरातील तीन सुवर्ण पेढ्यांमधून सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे संशयित महिलेचा शोध सुरू केला आहे. पोलिसांना संशयित महिला मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचा संशय असल्याने त्यादृष्टीने पुढील तपासाची दिशा ठरविण्यात आली आहे.
महिलेने २७ ऑक्टोबरला सर्वात आधी शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समध्ये चोरीचा यशस्वी प्रयत्न केला होता. अंगठ्या ठेवण्याच्या ट्रेमधील सोन्याच्या अंगठ्या काढून त्या जागी तिच्याकडील दोन नकली अंगठी ठेवल्याचे सेल्समन गिरीष जैन यांच्या लक्षात आले. त्यानंतर सीसीटीव्हीचे चित्रण तपासले असता, दुपारी पाच वाजेच्या सुमारास एक महिला शोरूममध्ये सोने खरेदीच्या बहाण्याने आली होती. हातात पर्स आणि अंगात हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या महिलेने सेल्समनला १० ते १२ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या दाखविण्यास सांगितले. सेल्समन इतर डिझाईनचे ट्रे घेण्यासाठी खाली वाकल्यानंतर तिने स्वतःजवळ असलेल्या दोन नकली अंगठ्या ट्रेमध्ये ठेवून सुमारे एक लाख ८५ हजार रूपये किमतीच्या दोन अस्सल सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोबारा केला. या प्रकरणी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक संतोष काळे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक संतोष काळे हे सोन्याच्या अंगठ्या चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता, त्याठिकाणी जळगावमधील भंगाळे ज्वेलर्सचे व्यवस्थापक संतोष चव्हाण हे देखील सोने चोरीची तक्रार करण्यासाठी आले होते. भंगाळे ज्वेलर्समधुनही २७ तारखेला एका महिलेने दुपारी साडेपाचच्या सुमारास हातचलाखी करून सुमारे १३ ग्रॅम वजनाची आणि सुमारे एक लाख ४५ हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली होती. अर्ध्या तासाच्या अंतराने दोन्ही दुकानांमधून जवळपास ३० ते ३५ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या महिलेने लंपास केल्याचे निदर्शनास आल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यात महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
याशिवाय, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एक नोव्हेंबरला दाखल तक्रारीनुसार जळगावमधील पु. ना. गाडगीळ सुवर्ण पेढीतुनही एका महिलेने २७ तारखेला सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास १० ग्रॅम वजनाची एक लाख ४० हजार किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. तिन्ही सुवर्ण पेढ्यांमधील चोरीच्या घटनांचे साम्य लक्षात घेता एकाच महिलेचा त्यात हात असल्याचा संशय बळावला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे त्या महिलेचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासले असता, सदर महिला जळगाव रेल्वे स्थानकापर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. मागील काही घटना लक्षात घेता संशयित महिला मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचा तर्क काढला गेला असून, त्या दृष्टीने पोलीस तपासाची चक्रे फिरवली गेली आहेत.
