नाशिक : ओझऱ (नाशिक) विमानतळाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याची मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे केली आहे. या विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. विमानतळाला स्थानिक भूमिपुत्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी एका गटाकडून होत आहे. दुसऱ्या गटाने जटायू अशी नामकरणाची मागणी केली आहे. खासदार वाजे यांनी आता तिसरे नांव सुचविल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नाशिक विमानतळाच्या नामकरणावरून आधीच दोन मतप्रवाह दृष्टीपथास पडत होते. यानिमित्ताने त्यात नवीन मतप्रवाहाची भर पडली. खा. राजाभाऊ वाजे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांची दिल्लीत भेट घेऊन नाशिकच्या ओझर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. यावेळी विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा वाजे यांनी उपस्थित केला. ओझर विमानतळाचे नामकरण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावावर करण्याची मागणी केली. चव्हाण यांनी नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलची स्थापना केली. या भागाला औद्योगिक, संरक्षण आणि हवाई दृष्टीने सक्षम केले, याची आठवण खा. वाजे यांनी मंत्री नायडू यांना करून दिली.
ओझरजवळील जानोरी येथे विमानतळ कार्यान्वित होऊन बरीच वर्ष झाली आहेत. अद्याप त्याचे नामकरण झालेले नाही. या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह रिपाइंकडून सातत्याने होत आहे. सामाजिक चळवळीत दादासाहेब गायकवाड यांचे मोठे योगदान होते. गायकवाड यांनी विमानांचा कारखाना नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे नाव विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी काही वर्षांपूर्वी आरपीआयने मनमाडला मोर्चा काढला होता. नंतर या विमानतळास जटायू नाव देण्याची मागणी पुढे आली. प्रभु श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिकनगरी ही कुंभनगरी आहे. जटायू यांचे रामायणात अमूल्य असे योगदान आहे. त्यामुळे या विमानतळास जटायू असे नाव देण्याची मागणी महर्षी पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे.