नाशिक – कोल्ड्रिफ सिरप (बॅच नं एसआर-१३) औषधाच्या वापरामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यात काही बालकांचे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे अन्न व औषध प्रशासनामार्फत या कोल्ड्रिफ कफ सिरपची विक्री, वितरण आणि वापर करणे तत्काळ थांबविण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाचे राज्य औषध नियंत्रक दा. रा. गहाणे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (औषधे) सु. सा. देशमुख यांनी नागरिकांना औषध खरेदी करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील काही मुलांच्या मृत्युच्या प्राप्त अहवालानुसार मृत्युचे कारण कोल्ड्रिफ कफ सिरप (बॅच नं.एसआर-१३, निर्मिती दिनांक मे २०२५, कालबाह्य दिनांक एप्रिल २०२७) हे असल्याचे उघड झाले आहे. हे औषध कांचीपुरम (तामिळनाडू) येथील स्त्रेसन फार्मा या उत्पादक कपंनीने तयार केले असून यात डायइथायलिन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. या औषधाचा महाराष्ट्रात वितरण झालेल्या साठ्याबाबत तामिळनाडू येथील अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधून महाराष्ट्रचा अन्न व औषध प्रशासन विभाग माहिती घेत आहे.
राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालये यांनी या औषधाचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता सर्व साठा गोठवावा. नागरिकांनी या औषधाचा वापर त्वरीत थांबवावा, तसेच कोल्ड्रिफ सिरप (बॅच नं एसआर-१३) चे विक्री व वितरण ताबडतोब बंद करावे. हे औषध कुणाकडे उपलब्ध असेल तर स्थानिक औषध नियंत्रण प्राधिकरणास याबाबत त्वरीत कळवावे. या औषध साठाबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर अथवा ९८९२८३२२८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महापालिका क्षेत्रातील तसेच जिल्ह्यातील औषध विक्रेते यांना संबंधित कंपनीचा औषध साठा वापरु नये, अशी सूचना देण्यात आली आहे. आतापर्यंत नाशिक विभागात संबंधित कोल्ड्रिफ कफ सिरप (बॅच नं.एसआर-१३) माल कुठेही आढळून आलेला नाही. कोल्ड्रिफ कफ सिरप (बॅच नं.एसआर-१३) आरोग्यासाठी धोकादायक असल्याने नाशिक विभागात कुठे याचा साठा आहे काय, याची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी खोकला, सर्दी यासंदर्भातील औषध खरेदी करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन नाशिक विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.