नाशिक: आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या देखरेखीसाठी बाहस्त्रोताव्दारे परिचारिकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांवर आश्रमशाळेतच प्रथमोपचार होणार असून त्यांच्या आरोग्याची निगा राखली जाणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९९ आश्रमशाळा असून, त्यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी धडे गिरवतात. हे सर्व विद्यार्थी निवासी असल्याने त्यांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, अधीक्षकांवर असते. दरवर्षी आश्रमशाळांना प्रथमोपचार पेटीसह औषध पुरवठा केला जातो. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती नसल्याने प्रथमोपचार करताना अडचणी येतात. आता परिचारिकांची नियुक्ती होणार असल्याने विद्यार्थ्यांना योग्य प्रथमोपचार मिळणार आहे.

हेही वाचा : नार-पार योजनेच्या पाण्यासाठी जनहित याचिका, समन्यायी तत्वावर वाटपासाठी जलहक्क समिती आग्रही

परिचारिका बाह्यस्त्रोताव्दारे भरण्यासाठी संस्थेची निवड करण्याकरिता आदिवासी आयुक्तालय स्तरावरून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक संस्थांना २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. दरम्यान, आदिवासी आयुक्तालय तसेच चारही अपर आयुक्त कार्यालयातील विविध पदांवर बाहस्त्रोताव्दारे नियुक्ती दिली जाणार आहे. त्यात वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : अजित पवार शस्त्र टाकणे अशक्य; छगन भुजबळ यांचा विश्वास

राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्रशासन सजग आहे. आश्रमशाळेतच विद्यार्थ्यांना प्रथमोपचारासह इतर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी परिचारिकांची नियुक्ती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य संभाळण्याची जबाबदारी संबंधित परिचारिकेवर राहणार आहे.

नयना गुंडे (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)