नंदुरबार; गुन्हेगारी वाढल्यानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात पोलिसांनी नाशिक जिल्हा-कायद्याचा बालेकिल्ला अभियान राबवित गुन्हेगारांना वठणीवर आणण्यास सुरुवात केली असताना नंदुरबार जिल्ह्यात किमान महामार्ग पोलिसांना तरी अवैधपणे वसुलीपासून आवरावे, अशी अपेक्षा मालमोटारी चालकांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटाखाली असलेल्या महामार्ग पोलिसांकडून मालमोटार चालकांकडून अवैधपणे पैसे घेतले जात असल्याच्या विरोधात मालमोटार चालकांच्या संतापाचा मंगळवारी उद्रेक झाला.
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात महामार्ग पोलिसांची चौकी आहे. या ठिकाणी पोलिसांकडून मालमोटार चालकांकडून २० ते ३० रुपये अवैधपणे घेतले जात असल्याचे आरोप वारंवार होतात. अशाच वादातून मंगळवारी एका चालकाने अवैध वसुलीविरोधात आत्महत्या करण्याची धमकी देत आंदोलनात्मक पवित्रा घेतला. या चालकाने आपली मालमोटार महामार्गावर आडवी लावली. मालमोटारीवर चढून आपल्या गळ्यात दोरी अडकवून पोलिसांच्या मनमानीविरोधात आंदोलन सुरु केले. या आंदोलनस्थळी काही अन्य मालमोटार चालकदेखील जमा झाले. त्यांनीही महामार्ग पोलिसांवर अवैधपणे पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप केला. याठिकाणी तैनात असलेले महामार्ग पोलीस स्थानिक मालमोटार वगळता बाहेरच्या चालकांकडून रोज येता-जाता २० ते ३० रुपयांची मागणी करतात. ही वसुली पोलिसांच्या वतीने खासगी व्यक्तींकडून केली जात असून त्यांना नाव, बिल्लाबाबत विचारणा केल्यास ते दंड (चलान) करतात. अथवा वरिष्ठांशी बोला, अशाप्रकारे त्रास देत असल्याचे अनेक मालमोटार चालकांनी सांगितले.
तीन तासांपासून चालक मालमोटारीवर बसून वसुलीविरोधात आंदोलन करत आहे. आपण केलेल्या विरोधानंतर आपल्याला जो दंड (चलान) करण्यात आला आहे, तो मागे घ्या, अशी त्याची मागणी आहे. या आंदोलनामुळे कोंडाईबारी घाटाखाली अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला आहे. आंदोलनामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिवाळीनंतर परतणाऱ्या प्रवाशांना या आंदोलनाचा चांगलाच फटका बसला असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महामार्ग पोलीस चौकीच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी अनेक वेळा भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. याठिकाणी अवैध वसुलीचा आरोप नवा नाही. याआधीही अनेक वेळा याठिकाणच्या वसुलीबाबत आरोप झाले आहेत.
विशेष म्हणजे ही महामार्ग पोलीस चौकी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीत येत नाही. या चौकीचे पोलीस अधीक्षक हे ठाणे येथे बसत असल्याने आणि पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी देखील नाशिकसारख्या शहरात बसत असल्याने या अवैध वसुलीच्या आरोपांची कोण दखल घेणार, हा प्रश्न आहे.
