जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात रिंगणगाव येथे मंगळवारी सकाळी १४ वर्षाच्या मुलाची अज्ञात व्यक्तींनी गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ३६ तासानंतर मध्य प्रदेशातून दोन संशयितांना अटक केली असून. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात सहभागी तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.
इयत्ता आठवीत शिकणारा तेजस महाजन हा सोमवारपासून बेपत्ता होता. सायंकाळी उशिरापर्यंत सगळीकडे शोध घेऊनही त्याचा कुठेच पत्ता न लागल्याने एरंडोल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. अखेर मंगळवारी सकाळी खर्ची गावालगतच्या एका शेतात तेजसचा मृतदेह धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. न्यायवैद्यक व श्वान पथकाने घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले. त्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्यासह जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यातील संशयितांच्या तपासाली गती दिली.
दरम्यान, तेजसचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता, त्या स्थळापासून ५० मीटर अंतरावर शेती कामासाठी वास्तव्यास राहणाऱ्या मध्य प्रदेशातील काही मजुरांची पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा हरदास वास्कले (रा. नांदीया, जि. खरगोण) आणि सुरेश खरते (रा. धोरा, जि. खरगोण) हे दोघे कुटुंबियांसह मंगळवारी सकाळी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली.
पेरणीचे दिवस असताना दोघेही शेत मालकांना काही एक न सांगता निघून गेल्याने त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संशय बळावला. पैकी हरदास वास्कले याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला असता तो फैजपूर- सावदा रस्त्याने जाताना दिसला. पोलीस अधीक्षकांनी तातडीने नाकाबंदीच्या सूचना देऊन हरदास यास ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्या बरोबर सुरेश खरते आणि रिचडीया कटोले हे फिरत असताना, तेजस महाजन याचा सुरेशला धक्का लागला होता. त्या वादातून सुरेशने तेजसला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच रिचडीयाने चाकुने गळ्यावर वार करून तेजसची हत्या केली. आपल्याला कोणीच पाहिले नसल्याची खात्री पटल्यानंतर तिघांनी तेजसचा मृतदेह खांद्यावर उचलून त्यांच्या झोपड्यांच्या बाजूला असलेल्या शेतात काटेरी झुडुपांमध्ये टाकून दिला. निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १० किलोमीटरची पायपीट करून सुरेश खरते यालाही जेरबंद केले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.