नाशिक – शहर परिसरात संततधार सुरू असताना रात्री खडकाळी भागात दुमजली इमारत कोसळून सात ते आठ जण जखमी झाले. अग्निशमन विभागाच्या पथकाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत पाच दुचाकींचेही नुकसान झाले.
जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असताना अनेक भागात नुकसानीला सामोरे जावे लागले. मालेगाव तालुक्यातील काही गावात ढगफुटीसदृश पाऊस होऊन मका आणि कापसाचे मोठे नुकसान झाले. घाटमाथ्यावरील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. सुरगाणा तालुक्यात झाडे पडून रस्ता बंद झाला तर, इगतपुरी तालुक्यातील पिंपरी-भावली रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
नाशिक शहर व परिसरात सायंकाळपर्यंत म्हणजे २४ तासांत ६६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यातील ४४.२ मिलीमीटर पाऊस हा केवळ रात्रीच झाला. शहरात काही भागात झाडाच्या फांद्याची पडझड झाली. गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे गोदा काठालगतच्या आठवडे बाजाराला प्रतिबंध करण्यात आला. पाणी पातळी वाढल्याने पात्रालगत अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाला कसरत करावी लागली. रात्री खडकाळी भागातील हॉटेल गरीब नवाजच्या मागे जुनाट दुमजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत मालक अन्सार खान आणि भाडेकरू नासीर खान यांचे कुटुंबिय अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह मनपाच्या बांधकाम विभागाच्या पथकाने धाव घेतली. अतिशय दाटीवाटीचा हा परिसर आहे. यामुळे बचाव कार्यात अडथळे आले. मदत कार्यासाठी मुख्यालयासह पंचवटी, सिडको केंद्रांचेही बंब बोलावण्यात आले.
अग्निशमन दलाच्या पथकांनी इमारतीत अडकलेल्या मुदस्सर खान (२१), आएशा खान (१५), आएशा शेख (१२), हामीज शेख (सात), झोया खान (२२), अक्सा खान (दिव्यांग, २६), मोहसीना खान (४०) यांना बाहेर काढले. काहींच्या डोक्यांना मार लागलेला होता. जखमींना नातेवाईकांसोबत जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे के. पी. पाटील यांनी दिली. या दुर्घटनेत पाच दुचाकींचे नुकसान झाले. कोसळलेली दुमजली इमारत आरसीसी बांधकामातील होती. वरील मजल्याचे बांधकाम करताना मध्यवर्ती भागात तिला आडव्या खांबांचा आधार देणे गरजेचे होते. परंतु, तसा आधार दिलेला नसल्याची बाब या दुर्घटनेनंतर समोर आल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.