नाशिक – पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने सोमवारीही जिल्ह्यातील १५ धरणांमधून विसर्ग सुरू होता. बहुसंख्य धरणांतील जलसाठा कमालीचा उंचावल्याने पाटबंधारे विभागाला पुढील पावणेतीन महिेने धरण सुरक्षितता व पूरस्थिती यांचा समन्वय ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे.पावसाळ्याला सुरूवात होण्याआधीच दाखल झालेला पाऊस मध्यंतरी काही दिवसांचा अपवाद वगळता सातत्याने कोसळत आहे. काही दिवसांपासून सूर्यदर्शनही घडलेले नाही. सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिला. हवामान विभागाने मंगळवारी काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस तर त्यापुढील तीन दिवस मध्यम व हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ या घाटमाध्यावरील भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असल्याने धरणांमधून विसर्गाचे प्रमाण कमी-अधिक करावे लागत आहे.

हंगामाच्या पहिल्या सव्वा महिन्यातच जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांतील जलसाठा ४४ हजार ३१७ दशलक्ष घनफूट म्हणजे ६३ टक्क्यांंवर पोहोचला. मागील महिन्यात जूनच्या मध्यानंतर म्हणजे २० तारखेपासून काही धरणांमधून विसर्ग करावा लागला. पावसाने इतर भाग व्यापला तसे अन्य धरणांचे दरवाजे उघडावे लागले. तेव्हापासून सातत्याने विसर्ग करावा लागत आहे. धरण परिचालन सूचीनुसार पावसाळ्यात कोणत्या महिन्यात किती जलसाठा असावा हे निश्चित असते. त्यानुसार अतिरिक्त पाणी मोठ्या प्रमाणात सोडावे लागत आहे. एरवी ही प्रक्रिया हंगामाच्या अखेरीस घडते. तेव्हा धरणे भरण्याच्या स्थितीत असतात. यंदा मात्र ती सुरुवातीला झाल्यामुळे पाटबंधारे विभागाला पुढील काळात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. कारण, गंगापूरसह अन्य प्रमुख धरणे तांत्रिकदृष्ट्या भरण्याच्या स्थितीत आहे. धरणात अकस्मात येणारे पाणी साठविण्यासाठी फारशी जागा नाही. पुढील काळात धरण सुरक्षित राखून पाणी सोडण्याच्या काटेकोरपणे नियोजनावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. धरणाखालील भागात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

धरणनिहाय विसर्ग

सध्या जिल्ह्यातील १५ धरणांमधून विसर्ग सुरू आहे. यात दारणा १३१६० क्युसेक, गंगापूर ६३३६, नांदूरमध्यमेश्वर ४३८८२, पालखेड ६४६, पुणेगाव २५०, भोजापूर ९९०, भावली ९४८, भाम ३२५२, वाकी ३६३, वालदेवी १३०५, आळंदी ६८७, कश्यपी १०००, मुकणे ४००, कडवा ३६२० आणि करंजवण ३१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

या वर्षी सात जुलैपर्यंत अशी स्थिती निर्माण झाली की, अनेक प्रमुख धरणे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण भरलेली आहेत. अद्याप निम्म्याहून अधिक पावसाळा बाकी आहे. धरणातून विसर्ग हे संवेदनशील काम आहे. धरणे भरण्याच्या स्थितीत असताना अतिवृष्टी वा ढगफुटी झाल्यास जलसंचयासाठी पुरेशी जागा नसते. स्थितीचा अंदाज घेऊन धरणातून पाणी सोडावे लागते. २००८ मध्ये पावसाच्या अखेरच्या पर्वात ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. तुडुंब भरलेले गंगापूर धरण सुरक्षित ठेवण्यासाठी अकस्मात पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे शहरात महापूरस्थिती निर्माण झाली होती. यावेळी जुलैच्या पूर्वार्धात गंगापूरसह अन्य धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झालेला आहे. पुढील कालखंड आव्हानात्मक असून अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.- उत्तमराव निर्मळ ( निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग)