नाशिक – नवरात्र उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर, श्रध्दा आणि भक्तीचा संगम. उत्सव काळात अनेकांकडून विशेषत: महिला वर्गाकडून उपवास धरले जातात. बऱ्याचदा उपवासाचे पदार्थ म्हणून पारंपरिक साबुदाणा, भगर, शेंगदाणे यासह गोड पदार्थांवर भर दिला जातो. मात्र यामुळे बऱ्याचदा आरोग्य विषयक अडचणी निर्माण होतात. या सर्व पार्श्वभूमीवर महिलांनी आरोग्य सांभाळावे, असे आवाहन वैद्यकीय वर्तुळातून करण्यात येत आहे.
नवरात्र म्हटंल की गरबा, दांडिया. तसेच उपवास. अनेक भाविक श्रध्देने नऊ दिवस उपवास करतात. यामध्ये काही एकाच वेळा फराळ करतात, काही पाणी तर काही दुधाचे सेवन करतात, एकाच धान्याचा आहार घेणे, विशिष्ट भाज्यांचे सेवन करणे, अशाही पध्दतीने हा उपवास होतो. मात्र उपवासात खाण्याच्या वेळा बदलतात तसेच.ताटातील खाद्यपदार्थही. दैनंदिन कामाचा ताण, कामाच्या वेळा यामध्ये उपवासातील खाद्यपदार्थामुळे काहींना डोकेदुखी, मळमळ, चक्कर असा त्रास होतो. काहींच्या शरिरातील पाणी कमी होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असल्याने दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने खात राहणे गरजेचे आहे. उपवासादरम्यान जड पदार्थाऐवजी हलके पदार्थ तसेच फळांचा रस घेणे गरजेचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाविकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
याविषयी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नवरात्र उत्सवाचा आनंद घेतांना शारीरिक श्रम कमी करावे. साबुदाना, भगर ऐवजी अन्य काही पर्यायांचा विचार व्हायला हवा. यामध्ये नवरात्रोत्सवासाठी नऊ दिवसांचा आहार आराखडा आहे. यामध्ये एक ग्लास पाणी, त्यात अर्धा लिंबुचा रस घ्यावा. सुकामेवा, ग्रीन टी, फळे, नारळाचे लाडु, मिल्क शेक, शेंगदाण्याचे लाडु, मखना, रायता, उकडलेले बटाटा, सुरण भाजी, दही आदी पदार्थ खावेत. साबुदाण्याचा अती वापर टाळावा.
दरम्यान, उपवासात जास्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन करू नये. नवरात्र काळात शक्य तेवढा मिठाचा वापर कमी करावा. तळलेले पदार्थ टाळावेत. हे पदार्थ पचण्यासाठी जड असतात. तसेच बाहेरील गोड पदार्थांचे सेवन कमी करावे. यामध्ये घरी राजगिरा शिरा, शेंगदाणा शिरा, राजगिरा लाडु, खजुराचे लाडु खावेत. रात्री पुरेशी झोप घ्यावी. हलका व्यायाम करावा तसेच पाणी पित रहावे जेणे करून तब्येत बिघडणार नाही, असे आहारतज्ज्ञांनी नमूद केले आहे.