नाशिक – कधीकाही महाराष्ट्रातील अग्रगण्य साखर कारखान्यांमध्ये गणना होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड साखर कारखान्याची रया गेली आहे. कारखाना विक्री करण्याच्या हालचाली नाशिक जिल्हा बँकेने सुरु केल्याने कामगार आणि सभासद आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत कामगारांचे ८१ कोटी ९४ लाख रुपये देणे आणि सभासदांच्या ठेवी परत मिळत नाहीत, तोपर्यंत कारखाना विक्री करू दिला जाणार नाही, निफाड कारखाना  सभासदांच्या आणि कामगारांच्या कष्टाच्या घामातून उभा राहिला आहे, त्याला असा गिळंकृत होऊ देणार नाही, अन्यथा सर्व कामगार कारखान्याच्या प्रवेशव्दारासमोरच आत्महत्या करतील, असा असा संतप्त इशारा निफाड साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत उपस्थित कामगार आणि सभासदांनी दिला.

यावेळी निफाड कारखान्याच्या कामगार व सभासदांनी निसाकासमोर  प्रचंड घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. भाऊसाहेबनगर येथील निफाड साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर निसाका कामगार, सभासद आणि शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. काही दिवसांपासून निसाकाबाबत वेगवेगळ्या चर्चा निफाड तालुक्यात सुरू असल्याने निफाड साखर कारखाना कामगार आणि सभासदांमध्ये संभ्रम पसरला आहे.

नाशिक जिल्हा बँक निसाका कारखाना विक्री करणार असल्याची चर्चा कामगार आणि सभासदांमध्ये आहे. त्या अनुषंगाने या विषयावर आयोजित बैठकीत कामगारांना बी. जी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. जोपर्यंत निफाड साखर कारखाना कामगारांचे ८१ कोटी ९४ लाख रुपये आणि सभासदांना ठेवी परत करत नाही, तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही.

अन्यथा आम्ही सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा त्यांनी दिला. कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, करंजगावचे माजी सरपंच व सभासद प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, लहू मोरे, नानासाहेब दाते, गोकुळ झाल्टे,अमित ताजने, सोमनाथ झाल्टे यांनी निसाका कारखाना नाशिक जिल्हा बँकेला विक्री करू दिला जाणार नाही, असा इशारा दिला.

साखर कारखाना सुरू करण्यासाठी आणि कारखाना वाचवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार अनिल कदम यांनीही बैठकीस व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले. आपण सभासद व कामगारांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही दिली.

बैठकीला माजी सरपंच तानाजी पूरकर, बाळासाहेब बागस्कर,  सुभाष झोमन, विजय रसाळ, विष्णुपंत मत्सगार,  पुंडलिक ताजने, शिवाजी मोरे, नितीन निकम, सचिन आढाव, किरण वाघ, केशव झाल्टे आदींसह पिंपळस, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, वडाळी, शिरसगाव, चांदोरी, सायखेडा, करंजगाव आणि गोदाकाठच्या विविध गावांमधील सभासद शेतकरी आणि कामगार उपस्थित होते. निफाड साखर कारखान्याच्या मालमत्ता विक्रीला आमचा ठाम विरोध आहे.

कामगारांचे ८१ कोटी रुपये देणी असताना जिल्हा बँकेने विक्रीचा घाट घातला आहे. हा कारखाना कधीही विक्री करू दिला जाणार नाही. त्यासाठी आम्ही तीव्र जनआंदोलन उभारू  – प्रमोद गडाख ( कार्याध्यक्ष, निफाड साखर कारखाना कामगार संघटना)