४३४ अत्यवस्थ रुग्ण; ज्येष्ठ नागरिकांना धोका अधिक
नवी मुंबई</strong> : शहरात करोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून करोनामुक्तीचा दर ९५ टक्केपर्यंत गेला आहे. करोनाबाधितांचा आकडा हा पन्नास हजारांच्या घरात गेला असून करोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ही १ हजार इतकी झाली आहे. सध्या ४३४ अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवाळीपूर्वी शहरात करोनाची स्थिती नियंत्रणात आली होती. दिवसाला तीनशे ते चारशेच्या घरात असलेली रुग्णसंख्या शंभरच्या खाली आली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील अनेक काळजी केंद्रे बंद केली होती. अत्यवस्थ रुग्णही कमी झाल्याने अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा वाढविण्याचे नियोजन पुढे ढकलले होते. मात्र दिवाळीत नागरिकांच्या बेफिकिरीमुळे दिवाळीनंतर करोनाबाधितांत वाढ झाली होती. तीही आता कमी झाली आहे. मात्र मृतांचा आकडा एक हजार झाला आहे.
करोनामुळे पहिला मृत्यू हा २३ मार्च रोजी झाला होता. त्यानंतर मृत्युदर हा वाढत गेला. जुलै महिन्यात मृत्युदर हा ३.२६ होता. तो आता २.४ इतका खाली आला आहे. मृत्युदर कमी झाला तरी शहरात दिवसागणिक २ ते ३ मृत्यू होत आहेत. करोनामुळे शहरात मृत्यू झाला नाही, असा सुरुवातीची काही दिवस वगळता एकही दिवस गेला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाला करोना मृत्यूबाबत आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यात इतर आजार असलेले व त्यांना करोना झाला अशांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.
मृत्युदर
* ९ जूनपर्यंत : ३.१३
* ९ जुलै : ३.२६
* ३ ऑगस्ट : २.६४
* ३ सप्टेंबर : २.२५
* ३ ऑक्टोबर : २.०५
* ३ नोव्हेंबर : २.०३
* ७ डिसेंबर : २.०४
करोनामृत्यू १०००
* कोपरखैरणे : १५२
* ऐरोली : १५५
* तुर्भे : १४२
* नेरुळ : १४८
* बेलापूर : १४४
* घणसोली : १११
*वाशी : १०४
* दिघा : ४४