कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हनुमंत केकान याने शुक्रवारी मद्याच्या धुंदीत गोंधळ घालत काही जणांना मारहाण ही केली  होती. त्याने यापूर्वीही असाच प्रकार एक वेळेस केला असल्याचीही माहिती समोर येत आहे. हे सर्व पाहता त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : नेरूळ येथून ५० हजार रुपयांची गावठी दारू जप्त

हनुमंत केकाण असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून कोपरखैरणे पोलीस ठाण्यात चालक या पदावर तो कार्यरत आहे. शुक्रवारी रात्री एका बारमध्ये मद्य पिताना एका ग्राहकाशी त्याची बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाली. या बाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार भोसले यांनी तात्काळ पथक पाठवून केकान याला पकडून थेट पोलीस ठाण्यात आणले. जेव्हा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यास अन्य पोलीस कर्मचारी घेऊन जात होते तेव्हा त्याने शिवराळ भाषेत उपस्थित सर्वांनाच बोलत पोलीस गाडीची मागच्या काचेवर जोरदार लाथ मारली. त्यात मागची काचच निखळून पडली. कसे बसे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल प्राप्त होताच त्याला तडकाफडकी निलंबित केले. त्याच्या विरोधात विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच घडल्या प्रकाराबाबत त्याच्या विरोधात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा- उरणच्या पाणथळीवर भराव; पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पोलीस कर्मचाऱ्यानेही जर कायदा हातात घेतला तरी त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. हनुमंत याच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.