ग्राहकांची संख्या मंदावली; आवक जास्त, पण मालाला उठाव कमी
नवी मुंबई : तौक्ते वादळामुळे सुरू झालेला मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यांचा फटका वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीलाही (एपीएमसी) बसला. जोरदार पावसामुळे मुंबई शहर व उपनगरांतील ग्राहक बाजारात फिरकलाच नाही. त्यामुळे बाजारात ग्राहकांची संख्या खूप कमी होती. भाजीपाला बाजारात २५ टक्के माल शिल्लक राहिला तर फळ बाजारात ग्राहक नसल्याने ७०ते ८०टक्के व्यवसाय मंदावला होता. जोरदार वारा आणि पावसामुळे मंगळवारीही बाजारात आवक कमी होईल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात रात्रीच गाड्या येत असतात. त्यामुळे सोमवारी बाजारात ५३८ गाड्यांची आवक झाली. मात्र मुंबई उपनगरात रात्रभर मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे मुंबईसह इतर शहरातील ग्राहक एपीएमसी बाजारात फिरकलाच नाही. त्यामुळे बाजारात २५ टक्के शेतमाल शिल्लक राहिला. मात्र बाजारात भाजीपाल्याची दर स्थिर होते. बाजारात राज्यातील आवक जास्त होती तर परराज्यातील गुजरात २० गाड्या, कर्नाटक १०, राज्यस्थान १० अशी कमी आवक होती. दररोज शेतमालाच्या ४०० ते ४३०गाड्या आवक होत असते. मात्र सोमवारी बाजारात राज्यातील शेतमाल जास्त दाखल झाल्याने ५३८ गाड्या आवक झाली होती.
फळ बाजारात ३०० गाड्या आवक झाली होती. मात्र ग्राहक नसल्याने ७० ते ८० टक्के व्यवसाय थंडावला होता, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तसेच कांदा-बटाटा बाजारात कांद्याच्या १३१, बटाटा ३० तर लसणाच्या १५ गाड्या आवक झाली होती. कांदा-बटाट्याला उठाव होता तर लसणाची विक्री कमी झाली होती.
छताचे पत्रे उडून वाहनांचे मोठे नुकसान
एपीएमसी धान्य बाजारात सोसाट्याच्या वाऱ्याने छताचे पत्रे उडून ते वाहनांवर पडल्याने जवळपास १० ते १२ वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.धान्य बाजारात दुकानाच्या छतातून दर पावसाळ्यात पाणी गळती होऊन धान्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळे एका दुकान मालकाने छतावर नवीन पत्रे बसवले होते. मात्र सोमवार दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्याने या पत्र्याचे संपूर्ण छतच उडाले. हे सर्व पत्रे खाली उभ्या असलेल्या वाहनांवर आदळून वाहनांचे मोठे नुकसान झाले.
भाजीपाला बाजारात आज राज्यातील शेतमाल जास्त दाखल झाला होता. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली होती. मात्र वादळी पावसामुळे बाजारात ग्राहक कमी होता. त्यामुळे बाजारात ६० ते ७०गाड्या असा २५ टक्के शेतमाल शिल्लक राहिला आहे.
– शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला बाजार समिती
