चोराने वाहनमालकाला दूरध्वनी केल्यानंतर पोलिसांकडून बेड्या

पनवेल : दुचाकी चोरी केलेल्या चोरट्याने पोलीस मागावर असल्याचे कळताच थेट दुचाकी मालकाला दूरध्वनी करून दुचाकी परत देण्याची तडजोड फोनवरून सुरू केली. मात्र पोलिसांत नोंदविलेली तक्रार परत घेण्याची अटही चोरट्याने ठेवली. अखेर १५ दिवसांनंतर या चोरट्याला दुचाकीसह पनवेल शहर पोलिसांनी पकडले.

पनवेलमधील किरण गुरव याने त्याची वर्षभरापूर्वी घेतलेली दुचाकी एक लाखात विक्रीस काढण्याची जाहिरात समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीला प्रतिसाद देत एका ग्राहक किरणला भेटण्यासाठी पनवेल शहरात आला. मात्र दुचाकी कशी आहे हे पाहत असताना तो चोरून पसार झाला. या घटनेनंतर किरणने तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांचे पथक चोरट्याचा शोध घेत होते. पोलिसांना या चोरट्याचा शोध लागल्यानंतर त्याच्या घरी रोजच्या रोज तगादा लावला. त्यामुळे या चोराने स्वत:, काही नातेवाईक आणि सामाजिक कार्यकत्र्यांच्या वतीने दुचाकीचे मालक किरण यांच्याकडे संपर्क साधला. दुचाकी देतो पण गुन्ह््याची तक्रार मागे घेण्यासाठी किरण यांच्यावर दबाव वाढू लागला. दुचाकी नको पण पोलिसांचा त्रास नको, अशी चोरट्याच्या नातेवाईक व इतरांची अपेक्षा होती. मात्र अखेर १५ दिवसांनी पोलिसांनी चोरट्याला दुचाकीसह नावडे येथे अटक केल्याची माहिती उपनिरीक्षक तारमाळे यांनी दिली. संबंधित चोरटा मुंब्रा येथे राहत असून त्याच्या दुचाकीचे इंजिन ठप्प झाले होते. त्या दुचाकीत चोरीच्या गाडीचे इंजिन लावायचे असे नियोजन असल्याचे चोरट्याने पोलीस जबाबात सांगितले.