उरण : अनेक महिन्यांची प्रतीक्षा असलेले उरण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे अखेर उरण पोलिसांनी कार्यान्वित केले आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ३५ कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यात शहरातील मुख्य ठिकाणे आणि उरण रेल्वे स्थानक परिसरात प्रवेशद्वारासमोर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्ह्यांपासून प्रवासी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जुलै २०२४ मधील तरुणीची निर्घृण हत्या आणि भीषण अपघातानंतर नागरिकांनी उरण रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली होती. मात्र ती उशिराने का होईना पूर्ण झाली आहे. उरण रेल्वे स्थानकासह शहरात पोलिसांकडून ३५ सीसीटीव्ही बसविण्यात आले असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली. १२ जानेवारी २०२४ ला बहुप्रतीक्षित उरण ते नेरुळ/ बेलापूर ही लोकल सुरू होऊन १६ महिने झाले आहेत. मात्र या परिसरातील रेल्वे स्थानक आणि परिसरातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सीसीटीव्हीची प्रतीक्षा कायम होती.
सुरक्षेबाबत नागरिकांना दिलासा
उरण ते नेरुळ आणि बेलापूर मार्गावरील लोकलच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. स्थानक परिसरात अनेक प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. या मार्गावर महिला, वृद्ध, विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करीत आहेत. उरण शहर हे दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यातच शहरातील अनेक भागांत चोरीच्या घटनांत ही वाढ होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे वाहन चोरी व इतर घटनाही घडत आहेत. या घटनांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचे नियोजन झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.