नवी मुंबई : सिडको महामंडळाने हजारो कोटी रुपये खर्च करुन खारघर उपनगराचे निर्माण केले. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून उपनगरातील पांडव मार्गावरील मुख्य सेवा कॉरीडॉर बांधण्याकडे दुर्लक्ष केल्याने या जागेवर गाळेधारकांनी अतिक्रमण केले. तसेच पनवेल पालिकेनेसुद्धा याच मोकळ्या जागेवर फलक उभारणीचे काम एका कंत्राटदाराला दिले. सध्या या सेवा कॉरीडॉरच्या विकासातील अडथळे दूर करणे हेच सिडको मंडळासमोर आव्हान बनले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिडकोला खारघरमध्ये शिरुन ही जागा मोकळी केल्याशिवाय खारघरवासियांना हा सेवा कॉरीडॉर मिळू शकणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. खारघर उपनगरातील सेंट्रल पार्क येथील ग्रामविकास भवनाची इमारत ते उत्सव चौक या दरम्यान मोकळ्या जागेवर सिडकोच्या नियोजन आराखडाप्रमाणे १३ मीटर रुंदीचा जागा सेवा कॉरीडॉरसाठी प्रस्तावित आहे. मुख्य रस्त्यालगत ८ मीटर रुंदीचा सेवा रस्ता, पदपथ आणि वाहनतळासाठी या जागेचा लाभ वाहनचालकांना होऊ शकणार आहे. सध्या ग्रामविकास भवन ते उत्सव चौक या दरम्यानचे गाळेधारक आणि गृहनिर्माण सोसायटी आणि फलकांमुळे येथे सेवा कॉरीडॉरचे काम सुरू करणे सिडकोला शक्य नसल्याचे सिडकोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

सिडको मंडळाकडून अद्याप या जागेचे हस्तांतरण झाले नसताना पनवेल महापालिकेने संबंधित जागेवर फलक उभारणीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करुन पालिकेचे उत्पन्न सुरू केले. खारघर युटीलिटी कॉरीडॉर हा पनवेल महानगरपलिका हद्दीतील व सिडकोच्या मालकीचा आहे. ६ सप्टेंबर २०२३ मध्ये सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय क्र. १२७६४ संबंधित जागेवरील जाहिरात फलकास परवानगी अथवा न हरकत देण्यास व्यवस्थापक (शहरसेवा-३) यांची नियुक्ती करण्यात आली. २३ डिसेंबरला सिडकोचे व्यवस्थापक (शहरसेवा-३) यांच्या निर्देशानंतर खारघर सेवा कॉरीडॉरवर असलेल्या जाहिरात होर्डीगच्या सर्वेक्षणकरिता समिती स्थापन करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी या समितीने संबंधित जागेवर सर्वेक्षण केले. यावेळी सिडकोच्या परिवहन व दूरसंचार विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जाहिरात फलकांना परिवहन विभागामार्फत कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे समितीने स्पष्ट केले.

पनवेल पालिकेने जाहिरात फलके लावण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने संबंधित कोरीडॉरच्या जागेवर सिडकोची परवानगी न घेता जाहिरात फलक उभारले. यासंदर्भात पनवेल मनपाला ते फलक निष्कासित करण्याबद्दल ८ मार्च २०२३ ला पत्राने कळविले. परंतु पनवेल पालिकेने ही कारवाई न केल्यामुळे १३ एप्रिल २०२३ ला सिडकोच्या बांधकाम नियंत्रण विभागाला योग्य ती कारवाई करण्याचे सूचविले. अद्याप सिडकोच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली नाही. याबाबत सिडकोचे जनसंपर्क विभागाशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच पनवेल पालिकेचे उपायुक्त प्रेसनजीत कार्लेकर यांनी माहिती घेऊन नंतर प्रतिक्रिया देऊ असे सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco panvel corporation panels construction service corridor kharghar ssb