लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि नियमित हात धुणे हीच करोनापासून बचावाची त्रिसूत्री असूनही नवी मुंबईत या नियमांचे पालन होताना दिसत नाही. आतापर्यंत अशा ११ हजार ७८० जणांवर कारवाई करण्यात आली असून ६१ लाख ३३ हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना समज मिळावी ही या कारवाईची भूमिका असली तरी अद्याप नियमांचे पालन होताना दिसत नाही. आठही विभाग कार्यालयांत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

विभाग कार्यालयांतील दक्षता पथकाबरोबर ८ विभाग कार्यालयनिहाय ८ विशेष भरारी पथके कारवाई करीत आहेत. या पथकात पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांसह दोन पोलीसही आहेत. आतापर्यंत ११ हजार ७८० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात बेलापूर विभागात २१२९ जणांवर शहरात सर्वाधिक कारवाई

झाली आहे. दिघामध्ये सर्वात कमी ७६३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मुखपट्टी न वापरणाऱ्या ६,२५५ जणांवर कारवाई करून ३१ लाख ३४ हजार १०० रुपये दंडवसुली तर सामाजिक अंतर न पाळणाऱ्या ८४८ दुकाने आणि ४५५३ नागरिकांवर कारवाई करीत २० लाख १३ हजार २०० रुपये, तर रस्त्यावर थुंकणाऱ्या ३२ जणांवर कारवाई करून ३० हजार ४५० रुपये दंड वसूल केला आहे.