नवी मुंबई : नवी मुंबई शहराचा ‘क्वीन नेकलेस’ अर्थात राणीचा रत्नहार समजल्या जाणाऱ्या पाम बीच रस्त्याची नागरिकांना, वाहनचालकांना नेहमीच भुरळ पडते. वाहतूक विभागाने प्रतिताशी घालून दिलेल्या ६० किमी मर्यादेचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन पामबीच मार्गावर होते. त्यामुळे याच मार्गावर सातत्याने अपघात होतात. अनेकांना आतापर्यंत येथे प्राणही गमवावे लागले आहेत. परिणामी या मार्गाच्या दोन्ही बाजुंना संरक्षक पत्र्याचे अडथळे निर्माण केले गेले. पण परंतु अपघातामध्ये निखळलेले हे अडथळे तसेच अर्धवट पडून आहेत आणि ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांना तसेच सायकलस्वारांना या अडथळ्यांचा अडथळा होऊ लागला आहे.
नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत तसेच माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून नेरुळ पामबीच मार्गाला लागून असलेल्या १३७ एकरच्या भूखंडावर ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई विकसित केले आहे. यात ६४ एकर जागेवर धारण तलाव तसेच ८ एकर जागेवर नैसर्गिक तलाव तसेच १४ एकरवर वॉकिंग ट्रॅक आणि याच परिसरात ३५ एकर जागेवर देशातील सर्वात मोठे मियावाकी जंगल उभे केले आहे. या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते.
पामबीच मार्गावरून प्रवास करणारे नागरिकही या भागात आवर्जून थांबून येथील आनंद घेतात. परंतु या रस्त्यावर भरधाव वेगाने सुसाट गाड्या चालवणाऱ्यांमुळे पामबीच मार्गाच्या दोन्ही दिशेला तसेच दुभाजकाशेजारी पालिकेने सर्वत्र संरक्षक पत्र्याचा अडथळा केला आहे. या अडथळ्यांचे अपघातांत नुकसान होते. काही दिवसापूर्वी दोन तरुणांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला होता. वाशीच्या दिशेला जाणारी गाडी सुसाट वेगाने विरुध्द दिशेला येऊन संरक्षक अडथळ्यावर आदळली. यामुळे संरक्षक अडथळा वाकून मार्गालगत असलेल्या सायकल ट्रॅकवर कलला आहे. चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी या कललेल्या अडथळ्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात नेहमी चालण्यासाठी येतो. परंतु अपघातात वाकलेला संरक्षक अडथळा सायकल ट्रॅकवर पडला आहे. त्यामुळे चालण्यासाठी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पालिका तसेच वाहतूक पोलीस विभाग यांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे. रमेश पुरी, नागरीक
पामबीच मार्गालगत असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात अपघातामुळे संरक्षक अडथळे पडलेले आहेत. ते पुन्हा सुस्थितीत करणे आवश्यक आहे. सायकल ट्रॅकवर पडलेल्या या संरक्षक अडथळ्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणाहून जाताना अडचण निर्माण होत आहे. रेखा पाटील, नागरिक