उरण: शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विमला तलावात व्यायाम आणि विसाव्यासाठी नागरिक येतात मात्र तलावातील कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. याचा ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उरणचा विमला तलाव हे विसाव्याचे ठिकाण, की नगर परिषदेची कचराकुंडी आहे असा सवाल केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरणसारख्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगर परिषदेचा विमला तलाव आहे. या तलावातील बाग, येथे असलेली लहान मुलांसाठीची खेळणी तसेच वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, बसण्याची व्यवस्था यामुळे दररोज या तलावात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.

पहाटे ५ वाजल्यापासून या तलावात नागरिकांची वर्दळ सुरू होते. ती सायंकाळी ९ वाजेपर्यंत असते. तर सायंकाळी शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी विरंगुळा म्हणून हे ठिकाण महत्त्वाचे आहे. उरण नगर परिषदेच्या माध्यमातून या तलावात अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक समस्यांना ही तलावात येणाऱ्यांना भेडसावत आहेत.

हेही वाचा… धरणावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, ६५० कोटींचा खर्च; महापालिका लवकरच निविदा काढणार

यामध्ये तलावात अनेक असुविधा आहेत. येथील बसण्यासाठी असलेली बाके तुटली आहेत. त्यामुळे बसण्याची गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे याच तलावात विसर्जन केले जात असल्याने निर्माल्य टाकले जात आहे.

अनेक नागरिक आपल्या घरातील निर्माल्य तलावात आणून टाकत आहेत. त्याचप्रमाणे तलावातील पाणी कायमस्वरूपी साचून राहात असल्याने व तलावातील कचरा कुजल्याने तलावातील पाण्याची दुर्गंधी निर्माण होत आहे.

आरोग्य सुधारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या तलावात दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उरणच्या विमला तलावातील दुर्गंधीमुळे होणाऱ्या त्रासावर उपायोजना करण्याची मागणी उरणच्या नागरिकांकडून केली जात आहे.

विमला तलावातील घाण आणि कचरा त्वरित हटविण्यात येईल. त्याचप्रमाणे नगर परिषदेने तलाव सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.- समीर जाधव, मुख्याधिकारी उरण नगर परिषद

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the garbage in the vimala lake a huge stench has started spreading uran citizens are suffering dvr