कंटेनर भरून गोवा राज्यातून विदेशी मद्याची स्वस्तात खरेदी करून रायगड, ठाणे व मुंबईमधील ढाब्यांवर विक्री करणारी टोळी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उद्ध्वस्त केली. जप्त मद्यसाठय़ाची बाजारातील किंमत एक कोटी पाच लाख इतकी रुपये आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे व्ही. राधा यांनी घेतल्यानंतर पथकाने टाकलेला हा पहिलाच छापा आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक क्रमांक २ ने ही कारवाई केली आहे. गोवा मुंबई महामार्गावरील पनवेल येथील शिरढोण गावाजवळील एकविरा ढाब्याजवळ या कंटेनरला थांबविण्यात आले. या वेळी कंटेनरचा चालक फरार झाला; मात्र त्याचा सहकारी पथकाच्या ताब्यात मिळाल्याची माहिती निरीक्षक एस. पी. कनसे यांनी दिली.
एमएच ४३ यू ५९३४ या कंटेनरमध्ये बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या भरलेल्या होत्या. चालकाने कंटेनरमध्ये राजस्थान येथून कोलगेट कंपनीचे खोके भरल्याची माहिती दिली होती; मात्र प्रत्यक्षात या कंटेनरमध्ये विदेशी विविध कंपन्यांची गोवा राज्याचे मोहोरबंद असलेले १८०० खोके सापडल्याची माहिती निरीक्षक एस. पी. लाड यांनी दिली.
- टोळी मद्याचा साठा ठाणे व मुंबई परिसरातील महामार्गावरील ढाब्यांवर विकत असण्याची शक्यता तपास यंत्रणेनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी जप्त केलेला कंटेनर हा ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी केलेला असल्याने या कंटेनरच्या मालकाची व वाहतूकदारांची याप्रकरणी चौकशी उत्पादन शुल्क विभागाने सुरू केली आहे.