नवी मुंबई : ऐन दिवाळीच्या काळात वाशी परिसरात काळोख दाटला. वाशीतील सेक्टर १४, एम.जी. कॉम्प्लेक्समधील ‘रहेजा रेसिडेन्सी’ या १२ मजली इमारतीला सोमवारी (२० ऑक्टोबर) मध्यरात्री साडेबारा वाजता लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली.
प्राथमिक तपासानुसार, इमारतीत दिवाळीच्या सजावटीदरम्यान झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. या भीषण आगीत जखमी झालेल्या १० जणांवर जवळच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती इमारतीच्या व्यवस्थापकांनी दिली.
सोमवारी मध्यरात्री १२.३५ च्या सुमारास या इमारतीच्या १०व्या मजल्यावर आग लागल्यानंतर काही क्षणांतच ती ११व्या आणि १२व्या मजल्यापर्यंत पसरली. रात्री वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संपूर्ण मजल्यांमध्ये धुराचे लोट पसरले होते. अकराव्या मजल्यावरील रहिवाशांनी वेळेत बाहेर धाव घेतली; परंतु बाराव्या मजल्यावरील बी/१२०५ मधील रहिवासी सुंदर पालक कृष्णन (४२), त्यांची पत्नी पूजा राजन (४०) आणि सहा वर्षांची चिमुकली वेदिका या तिघांनी घरातील बाथरूममध्ये आसरा घेतल्याने संपूर्ण मजल्यावर पसरलेल्या धुरात गुदमरून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. तसेच, दहाव्या मजल्यावरील बी/१००५ मधील ८४ वर्षीय वृद्ध महिला कमलाबाई हिरालाल जैन यांनाही यात प्राण गमवावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण २ विंग असलेल्या या इमारतीच्या बी विंग मधील १००५ या घरात पहिल्यांदा आग लागली. तेव्हा कुटुंबातील सर्व व्यक्ती बाहेर पडल्या परंतु, कमलाबाई या आजारी असल्याने व त्यांचे वजन जास्त असल्याने कुटुंबियांना त्यांना उचलून बाहेर आणता आले नाही. त्यातच आगीचा भडका वाढल्याने त्यांचा त्यात दुर्दैवी अंत झाला.
रात्रभर चालले बचावकार्य
आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन केंद्रातील पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एकूण सात अग्निशमन गाड्या, चार जलवाहिन्या आणि चाळीसहून अधिक जवानांनी घटनास्थळी दाखल होत तीन तासांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी धुरामुळे रहिवाशांना अडचण येऊ नये म्हणून अग्निशमन दलाने शिडीच्या साहाय्याने अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर जखमींना वाशीतील एमजीएम रुग्णालय व इतर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर तातडीने इलाज करण्यात आले. या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
व्हेंटिलेशनचा अभाव ठरला जीवघेणा
या सर्व घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पाहणी वेळी प्राथमिक तपासात इमारतीत व्हेंटिलेशनची सोय नसल्याने रहिवासी धुरात अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. “या घटनेनंतर शहरातील सर्व उंच इमारतींचे व्हेंटिलेशन व अग्निसुरक्षा लेखापरीक्षण तातडीने करण्यात यावे,” असे निर्देश आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत.
प्रशासन आणि पोलिसांकडून तपास सुरू
वाशी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक अहवालानुसार, दिवाळीच्या रोषणाईदरम्यान विद्युतजोडणीतील बिघाडामुळे शॉर्टसर्किट झाले असावे. असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच, वीज पुरवठा कंपनी आणि महापालिकेच्या तांत्रिक पथकांनीही घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.
परिसरात शोककळा
एम.जी. कॉम्प्लेक्स हे वाशीतील अतिशय जुने रहिवासी संकुल म्हणून ओळखले जाते. यातील ‘रहेजा रेसिडेन्सी’ इमारतीत एकूण ७२ कुटुंब राहतात. या दुर्घटनेमुळे एम.जी. कॉम्प्लेक्स आणि वाशी परिसरातील रहिवाशांवर शोककळा पसरली आहे. सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या दुर्घटनेने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. केवळ वाशीच नव्हे तर शहरातील नागरिक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्त्यांकडून मृतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, अनेकांनी या दुर्दैवी घटनेनंतर दिवाळी सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, अग्निशमन दलाकडूनही नागरिकांना दिवाळीच्या काळात सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना उबाठा गटाच्या विभाग प्रमुखांनी घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना इमारतीच्या मुख्य रस्त्यावरील दुतर्फा वाहन पार्किंगकडे इशारा करत रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्ण वाहिका इमारतीत येण्यास विलंब झाल्याने नागरिकांचे जीव वाचवता आले नाहीत असा आरोप केला आहे. त्यामुळे कोणत्याही इमारतीच्या दुतर्फा वाहन पार्किंगला परवानगी देऊ नये अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे विभाग प्रमुख रवी कदम यांनी केली आहे. या घटनेनंतर आता मात्र, उंच इमारतींतील अग्निसुरक्षा उपायांविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“शहरातील नागरिकांनी दिवाळीच्या काळात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासोबतच आपल्या घराची काळजी घेणेही गरजेचे आहे. दिवाळीच्या काळात घरातून बाहेर पडताना आठवणीने घरातील सर्व दिवे विझवून आणि विद्युत पुरवठा करणारे मेन स्विच बंद करूनच घरा बाहेर पडावे. तसेच, आग लागण्याच्या वेळी इमारतीतील व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशी आमची नागरिकांना विनंती आणि आवाहन आहे.” – पुरुषोत्तम जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी, वाशी