नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली येथे मनपाने जलतरण तलाव बांधला. मात्र सुरवातीपासून हा तलाव वादात अडकला आहे. केवळ आठ वर्षात दुसऱ्यांना येथील एक मोठा भाग पडला असून सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. हि घटना सोमवारी अपरात्री घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशीच घटना २ जुलैला घडली होती. त्यावेळेस धडा घेऊन पाहणी करून योग्य ती डागडुजी केली असती तर हि वेळ आली नसती. अशी चर्चा जलतरण तलाव कर्मचारी वर्गात आहे.

नवी मुंबईत मोठा गाजवला करीत घणसोली येथे जलतरण तलाव बांधण्यात आला. हा तलाव सुरवातीपासून वादात आहे. जेव्हा बांधण्यात आला तेव्हा त्याची खोली मानक पेक्षा अधिक असल्याने क्रीडा विभागणारे वापरण्यास परवानगी दिली नाही. त्यात अनेक दिवस बंद ठेवण्यात आल्या नंतर शेवटी बदल करण्यात आला. तरीही प्रत्यक्षात बांधण्यात आल्या नंतर सुमारे सात वर्षांनी वापरण्यास सुरु करण्यात आला.

सोमवारी रात्री परत जलतरण तलावाच्या छताचा काही भाग कोसळला. ही पहिलीच वेळ नाही छताचा भाग कोसळण्याची याआधीही अनेक वेळा छताचा छोटा छोटा भाग कोसळला आहे, मात्र २ जुलै आणि २९ सप्टेंबरला मोठा भाग कोसळला. जलतरण तलावात पोहून झाल्यावर पुन्हा उडी मारण्यासाठी लहान मुले ज्या भागातून उडी मारण्यास जातात त्याच ठिकाणी असणारा सज्जा कोसळला आहे. रात्र असल्याने या ठिकाणी कोणीही नव्हते अन्यथा दुखापत झाली असती.

याबाबत अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी सांगितले कि बांधकाम निकृष्ट असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. याची अधिक खोली झाल्याने परवानगी न मिळणे , पुन्हा दुरुस्ती , पुन्हा गळती असे अनेक अडचणी पार करीत कसाबसा सुरु झाला. त्याला उदंड प्रतिसाद हि मिळाला. मात्र आता पडझड सुरु झाली आहे.

या प्रकरणी क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांना विचारणा केली असता पर्यवेक्षण पर्यंतच आमचे काम मर्यादित आहे असे सांगण्यात आले. जलतरण तलाव असणाऱ्या उद्यान विभागाचे उपायुक्त स्मिता काळे यांना विचारणा केली असता घटना आत्ताच मला कळली आहे. माहिती घेत योग्य ती पाऊले उचलली जातील असे त्यांनी सांगितले.