टाळेबंदीत नोकरी गेल्याने रोजगारासाठी धडपड; नोकरीची नवी संधी मिळत नसल्याच्या भावना

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : टाळेबंदीत अनेकांना नोकरी गमावावी लागली असून नव्याने संधी निर्माण होत नसल्याने नवी मुंबईतील कामगार नाक्यांवर रोजगारासाठी गर्दी वाढली आहे. यात आता पदवीधरही रोजगाराच्या शोधात दिसत आहेत. करोना संसर्गापासून गावाकडे गेला, मात्र परत आल्यापासून हाताला काम नसल्याने छोटीमोठी कामे करण्यापासून पर्याय नसल्याचे ही तरुणाई सांगत आहे.

बेलापूर गाव, करावे गाव, नेरुळ बसस्थानकाबाहेर, तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली आदी ठिकाणी हे कामगार नाके आहेत. या ठिकाणी रंगरंगोटी, बांधकाम, खोदकाम तसेच वाहतुकीची कामे मिळतात. यासाठी सकाळी या नाक्यांवर ही कामे करणारे असंख्य लोक उभे असतात. मोलमजुरीसाठी येथून मजुरांचा पुरवठा होतो. या नाक्यांवर इतर वेळीही रोजगारासाठी गर्दी असते. आता मात्र या गर्दीत वाढ झाली असून यात शिकलेले तरुणही दिसत आहेत.  टाळेबंदी जाहीर केल्यानंतर अनेकांनी सुरक्षित राहण्यासाठी आपले गाव गाठले. तीन-चार महिने गावी राहिल्यानंतर टाळेबंदी शिथिलीकरणानंतर ते नोकरीसाठी शहरात परतले. यात अनेक नोकरदारांसह छोटेमोठे व्यवसाय करणारेही होते. मात्र त्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर व्यवसायही बंद झाला आहे. त्यामुळे  उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. नव्याने नोकरीच्या संधीच निर्माण होत नसल्याने आता मोलमजुरी शिवाय पर्याय राहिलेला नाही असे येथील तरुण सांगत आहेत.

टाळेबंदीनंतर पुन्हा कामासाठी रायगड जिल्ह्यातून पुन्हा नवी मुंबईत आलो तर नोकरी गेली. ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू घरोघरी पोहोचवण्याचे काम करीत होतो. आता जास्त कामगारांची गरज नसल्याने कामावर काढून टाकले. दुसरा पर्याय शोधला, मात्र मिळाला नाही. आता कामगार नाक्यावर मिळेल ते काम करतो.

– लीलाधर म्हैसकर, रायगड (पदवीधर)

गावाकडे काम मिळत नाही म्हणून शहरात आलो. टाळेबंदीनंतर आता येथेही काम मिळणे कठीण झाले आहे. केलेल्या कामाचा मोबदलाही नीट मिळत नाही. त्यामुळे खायचे काय आणि गावाकडे कुटुंबीयांना पाठवायचे काय? असा गंभीर प्रश्न आहे.

प्रदीप गुप्ता, बस्ती, उत्तर प्रदेश (१४ वी पास)