पावसाचा परिणाम; उत्पादनात ५० टक्के घट
नवी मुंबई</strong> : यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नियोजन कोलमडले असून याचा द्राक्ष उत्पादनावरही परिणाम झाला आहे. द्राक्ष उत्पादनात यावर्षी ५० टक्के घट येण्याची शक्यता असून मुंबईकरांना एक महिना उशिरा द्राक्षांची गोडी चाखता येणार आहे.
वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत डिसेंबरपासून सुरुवात होत असते. बाजारात साधारण दरवर्षी १५ नोव्हेंबरनंतर द्राक्षची अधिक आवक सुरू होत १५ एप्रिलपर्यंत हंगाम सुरू असतो. मात्र यावर्षी अद्याप आवक कमी प्रमाणात असून एक ते दीड महिना उशिराने हंगाम सुरू होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात द्राक्षाच्या ४ ते ५ गाडय़ा दाखल होत होत्या.
एपीएमसी बाजारात सांगली, नाशिक येथून मोठय़ा प्रमाणावर द्राक्ष आवक होत असते. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे यावर्षी छाटणीला आलेली द्राक्ष खराब झाली आहेत. त्यामुळे सध्या बाजारात बारामतीहून फक्त १०० बॉक्स आवक होत आहे. दरवर्षी १५ डिसेंबरनंतर आवक वाढत असते. यावर्षी १५ जानेवारीनंतर द्राक्ष आवक होईल, मात्र उत्पादनच कमी झाल्याने आवक कमी प्रमाणातच राहिली, असे घाऊक फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले.
दावण्या, करपा रोग
ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात द्राक्ष छाटणी सुरू होते. मात्र यावेळी एन छाटणी काळातच पावसाने हजेरी लावल्याने हाताशी आलेला माल खराब झाला आहे. दावण्या रोगामुळे द्राक्षावर पांढरी बुरशी तर करपा रोगामुळे द्राक्षाचे घड कुजून गेले आहेत. त्यामुळे उत्पादनात ५० टक्के घट अपेक्षित आहे.
अवकाळी पावसाने द्राक्षाचे भरपूर नुकसान झाले आहे, आमच्या शेतामध्ये दर वर्षी ८ टन उत्पादन घेतो, मात्र यंदा ३ ते ४ टन उत्पादन होणार आहे.
– नंदकुमार पवार, द्राक्ष बागायतदार, सांगली