पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता.१३) मतदानासाठी कामगारांना सुट्टी देण्याचे निवडणूक आयोगाचे शासन परिपत्रक असतानासुद्धा तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदारांनी कामगारांना मतदानाची सुट्टी सरसकट न दिल्याने कामगारांनी थेट मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत संपर्क साधल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या दट्यानंतर कामगारांना दुपारच्या सत्रातील मतदानासाठी दोन तासांची सवलत देण्यात आली.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील डब्ल्यू २४ या भूखंडावरील मार्वल ड्रग्स या कंपनीने सोमवारी निवडणुकीसाठी कामगारांना सुट्टी न दिल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांना समजल्यावर त्यांनी तातडीने निवडणूक आयोगाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या कंपनीकडे रवाना केले. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी तातडीने पोलिसांचे पथकसुद्धा कंपनीकडे प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी पाठविल्यावर कंपनीने निवडणुकीसाठी सुट्टी दिली नसल्याचे सिद्ध झाले अखेर निवडणूक आयोगाने कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने दोन तासांची सवलत जाहीर करुन कामगारांना निवडणुकीत मतदान करा आणि मतदान केलेले छायाचित्र कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवावा अशा सूचना केल्या.

हेही वाचा – मोबाईलसह मतदान केंद्रात प्रवेशबंदीवरुन अनेक ठिकाणी पोलीस व मतदारांमध्ये वाद

हेही वाचा – पनवेलमध्ये ११ वाजेपर्यंत १४.७९ टक्के मतदान

कंपनी मतदान केलेल्या कामगारांसाठी एक सोडत घेऊन बक्षीस देणार असल्याचे मार्वल कंपनीने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे तळोजातील अनेक लहान कारखान्यांनी निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी काही तासांची सवलत देणे अपेक्षित होते. परंतु रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाचा दाखल देत रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी तळोजातील काही कारखानदारांनी कारखाने बंद ठेवल्याची सबब देण्यात आली. मात्र मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कारखानदारांनी काही तासांची सवलत देणे गरजेचे होते असे कामगारांच्यावतीने मागणी करण्यात येत होती.