पेण तालुक्यातील भोगेश्वरी नदीवर बांधण्यात आलेले हेटवणे धरणाची उंची वाढविण्यासाठी सिडको प्रयत्न करणार आहे. हे धरण जलसंपदा विभागाचे आहे मात्र १९९८ मध्ये सिडकोने या धरणाच्या उभारणासाठी अर्थसहाय्य केले होते. त्याचप्रमाणे आता निधी देऊन महामुंबईकरांची तहाण भागविण्यासाठी सिडको प्रयत्न करणार आहे.

पेण व पनवेल तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविताना राज्य सरकारने वाक्रुळ गावातील भोगेश्वर नदीवर हेटवणे धरण बांधले आहे. या धरणाची उंची सध्या ४८ मीटर असून लांबी ६७५ मीटर आहे. मातीच्या या धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोने १९९८ मध्ये जलसंपदा विभागाला अर्थसहाय्य केले होते. त्याबदल्यात सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईतील काही उपनगरांसाठी पिण्याचे पाणी दिले जात आहे मात्र अलीकडे ह्य़ा पाण्याचा तुटवडा भासत आहे. सिडकोने नैना क्षेत्रासाठी दीर्घ व लघु प्रकारच्या पाणी पुरवठा योजना तयार केलेल्या आहेत. यात कर्जत तालुक्यातील कोंढोणे धरणाचे हस्तांतरण सिडकोने करुन घेतले आहे. यासाठी चारशे कोटी रुपये जलसंपदा विभागाला खर्चापोटी देण्यात आलेल्या आहेत. या धरणाच्या आजूबाजूला असलेल्या जमिन संपादनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्याचप्रमाणे कोंढाणे ते नवी मुंबई या ३४ किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकल्यानंतर हे पाणी नवी मुंबईकराची तहाण भागविणार आहे. पण त्यापूर्वी सिडको रायगड जिल्ह्य़ातील लघु योजना पूर्ण करण्यास प्राधिकरणांना मदत करणार आहे. यात हेटवणे धरणाची उंची वाढवून आणखी त्यांची क्षमता वाढविल्याने सिडको क्षेत्रासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.