सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात परवानाधारक हॉटेल, बार, पब चालक व्यावसायिंकांनी तयारी सुरु केली आहे. यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या पत्रानुसार यावर्षीचा नववर्षाचा जल्लोष पहाटे ५ वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिंकांमध्येही उत्साह असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबई : विशेष गोवर रूबेला लसीकरण मोहिमेत उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण पूर्ण

करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत करोनामुळे नववर्षाच्या स्वागताचे तीन तेरा वाजले होते. तर एक वर्षी करोना नियमांच्या चौकटीत नववर्षाचा जल्लोष शांतपणे साजरा करण्यात आला होता.परंतू यंदा चीन व इतर देशामध्ये वाढलेल्या करोनाच्या आकडेवारीचा सध्यातरी भारतावर परिणाम पाहायला मिळत नसून शासनामार्फत खबरदारी घेतली जात आहे.त्यामुळे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे यंदाचा नववर्षाचा जल्लोष उत्साहात होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. करोनाच्या काळात करोना नियमावलीमध्ये करण्यात आलेल्या नववर्ष स्वगताच्यावेळी नियमांचे पालन न केल्याने गेल्यावर्षी पालिकेने ४ लाख ७० हजाराचा दंड ठेठावला होता.परंतू यंदा मात्र नववर्ष जल्लोषात साजरे केले जाणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : नाल्यातील काळ्या पाण्यामुळे पिरवाडी किनारा काळवंडला

मुंबईच्या झगमगत्या शहराबरोबरच शेजारीच वसलेल्या नवी मुंबईतही नववर्षाचा जोश पाहायला मिळणार आहे. शहरात बेलापूर ते दिघापर्यंत विविध प्रकारची हॉटेल्स, बार ,पब आहेत. त्यामुळे या शहरातही रात्रीचा झगमगाट नेहमी पाहायला मिळतो. सध्या शहरात वाशी व सर्वात अधिक बेलापूर सेक्टर १५ हे हॉटेल व पबचे हब बनले आहे. या ठिकाणी फक्त नववर्षानिमित्त नव्हे तर नेहमीच झगमगाट पाहायला मिळतो. त्यामुळे हे नववर्ष स्वागताचे औचित्य साधत आणखीनच झगमगाट पाहायला मिळणार आहे. विविध हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या ऑफर्स सुरु आहेत व ३१ तारखेसाठीचे आगाऊ बुकींग सुरु आहे.त्यामुळे यंदाचा सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करतानाचा उत्साह अधिक पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या पत्रानुसार नववर्षासाठी परमीट रुम, हॉटेल, रेस्टॅारंट ऑक्रेस्ट्राबार १ जानेवारी २०२३च्या पहाटे ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलीस विभागामार्फत योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. शासनाने पुढील १ दोन दिवसात सूचनांमध्ये बदल न केल्यास पहाटे ५ पर्यंत हॉटेल,बार सुरु ठेवण्याची परवानगी आहे. पोलीस विभाग सुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगून नियोजन करत आहे, अशी माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

हेही वाचा- नवी मुंबई : गृहिणींचा लसूण तडका महागला; दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ

करोनाच्या काळात नववर्षाच्या उत्साहावर निर्बंधाचे सावट होते.परंतू शासनाने जाहीर केल्याप्रमाणे या नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक समाधानी आहे. पहाटे ५ पर्यंत हॉटेल व रेस्टॅरन्ट बार सुरु राहतील, अशी माहिती नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी महेश शेट्टी यांनी केली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hotels bars pubs in navi mumbai have started commercial preparations on the occasion of december 31 dpj