नवी मुंबई: मोबाईल वापरत असताना त्यावर अनेक जाहिरातीच्या लिंक हमखास येतात. अशा लिंक उघडू नका, फसवणूक होऊ शकते अशा सूचना पोलीस वारंवार देतात. मात्र अशा महत्वाच्या सूचनांकडे गांभीर्याने पहिले जात नाही. परिणामी फसवणूक होते. असाच प्रकार नवी मुंबईत घडला असून एका व्यक्तीने लिंक उघडली त्यात गुंतवणूक आकर्षक योजना दिसल्या म्हणून आमिषाला बळी पडत गुंतवणूक केली मात्र परतावा तर लांबच गुंतवणूकही गेली. 

भांडूप येथे राहणारे निलेश गावंडे हे नवी मुंबईतील ऐरोली स्थित टेक्नॉलॉजी सोल्युशनसारख्या कंपनीत काम करतात. २३ डिसेंबर रोजी नेहमी प्रमाणे सहज मोबाईल हाताळत असताना एक लिंक त्यांना आली, त्यावर क्लिक केले असता ऑल स्टोक अकॅडेमी या व्हाॅट्सअॅप  समूहात त्यांचा समावेश झाला. त्या समूहाचे तीन प्रशासक (अॅडमिन ) होते. त्यातील हरीश सदानी हे प्रोफेसर होते , जे सट्टा  बाजारात गुंतवणूक कशी करावी याची माहिती देत होते. गुंतवणूक बाबत माहिती मिळाल्यावर निलेश यांनी १५ जानेवारीला गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे समूहावर कळवले. त्यावेळी रिया नावाच्या मुलीने एक लिंक देत ती उघडून बँक खात्याची माहिती भरा त्यातून तुम्हला जेथे गुंतवणूक करावयाची आहे तेथे पैसे पाठवता येतात अशी माहिती दिली.

हेही वाचा : नवी मुंबई : गेले अतिक्रमण हटवण्यास अन् सापडला २० किलो गांजा, एकाला अटक 

हि माहिती दिल्यावर व्हीआयपी ६५ नावाच्या व्हाॅटसअॅप ग्रुपमध्ये निलेश यांचा समावेश झाला. सुरूवातीला काही पैसे भरल्यावर दोन दिवसांत चांगला परतावा मिळाला. जो १५ जानेवारीला बँक खात्यात जमा झाला. त्यामुळे निलेश यांचा विश्वास बसला. त्यामुळे अजून गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर आयपीओ खरेदी करा असे सांगत एकदा ४ लाख ३० हजार ५०० तर दुसऱ्यांदा ५ लाख ४५ हजार ३०० अशी रक्कम निलेश यांनी देत आयपीओ विकत घेण्यासंबंधी चर्चा सुरु होती. दरम्यान अजून विविध कारणे देत २ लाख ९२ हजार दिले. मात्र त्यानंतर  काही दिवसांत पुन्हा १ लाख ६१ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. मात्र हे पैसे देण्यास नकार दिल्यावर या दरम्यान जे चार जण संपर्कात होते त्या सर्वांनी संपर्क बंद केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निलेश यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जाची शहानिशा करून पोलिसांनी आर्थिक फसवणूक अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.