नवी मुंबई : नवी मुंबई येथील सह दुय्यम निबंधक वर्ग १ येथील कार्यालय क्रमांक ८ येथे १० दिवसात अनधिकृत मालमत्ता असलेले ८४२ दस्तांची नोंदणी झाल्याचा घोटाळ्यामध्ये १० दिवसांमध्ये ज्या अनधिकृत मालमत्तांचे दस्त नोंदणी झाली त्यामध्ये सर्वाधिक मालमत्ता या घणसोली परिसरातील असल्याची माहिती ‘लोकसत्ता’च्या हाती लागली आहे.
नवी मुंबईतील कोट्यवधी रुपयांच्या दस्त घोटाळ्यामुळे सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथील दलाल संस्कृती सदनिका कायदेशीर असल्याचे भासविण्यासाठी कसा दुरुपयोग करू शकते याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत सह दुय्यम निबंधक राजकुमार दहिफळे याला एकट्यालाच दोषी ठरवून निलंबनाची कारवाई कऱण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधण्यासाठी अजूनही नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला नाही.
नोंदणी शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी केलेल्या सखोल चौकशीमध्ये १८ ते २८ जून या दरम्यान नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ८ येथे अनधिकृत मालमत्ता माहिती असतानाही ८४२ दस्त नोंदणी कऱण्यात आले. यापैकी ४३९ दस्त हे एकट्या घणसोली परिसरातील आहेत.
घणसोली व कोपरखैरणे येथील ज्या अनधिकृत मालमत्तांचे सर्वाधिक दस्त जून महिन्यात नोंदणी करण्यात आले. त्या मालमत्ता कधी बांधल्या, त्या मालमत्तांना महावितरण कंपनीची वीज, पाणी पुरवठा आणि मलनिसारण वाहिनीची जोडणी कशी आणि कोणाच्या सांगण्यावरून मिळाली याची चौकशी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि सिडको मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्राधान्यांने केल्यास या अनधिकृत मालमत्तांना कायदेशीर भासविण्यासाठी करणाऱ्यांची नावे उजेडात येतील.
सामान्य गुंतवणुकदारांना संबंधित मालमत्तेमध्ये पाणी, वीज आणि मलःनिसारण वाहिन्यांची जोडणी असल्यासोबत या मालमत्तेची दस्त नोंदणी असल्यामुळे त्यांना हे घर कायदेशीर असल्याचे भासवले जाते. २० लाखात वन आरके घर खरेदी करून त्या घराचे मासिक भाडे १० हजार रुपये मिळत असल्याने स्वस्त घरातून उत्पन्नामुळे अनेक गुंतवणूकदारांनी या अनधिकृत मालमत्तांची खरेदी केल्याचे समोर येत आहे.
कोणत्या भागातल्या किती नोंदणी?
कोपरखैरणे परिसरातील ८३ आणि नेरूळ परिसरातील ६४, गोठीवलीमधील ३८, तळवली परिसरातील ३०, करावे येथील २९, रबाळे परिसरातील २७,ऐरोली येथील २२, सारसोळे परिसरातील १७, खैरणे परिसरातील १६, जुहू गाव १५, महापे परिसरातील १४, दिवा येथील ७, शिरवणे परिसरातील ६ आणि वाशी पाच, दारावे, भंडार्ली आणि दिघा परिसरातील प्रत्येकी ३,बेलापूर, सानपाडा आणि शहाबाज या परिसरातील प्रत्येकी २ आणि वळवली, पाचपाखाडी, पाली, नवघर, कळवा, जुईगाव, दहिसर या परिसरात प्रत्येकी १ अशा दस्तांची नोंदणी दहिफळे यांनी या घोटाळ्यातील १० दिवसांमध्ये नोंद केल्याची माहिती समोर येत आहे.