महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अपुऱ्या सुविधा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वाशीव्यतिरिक्त इतर रुग्णालयांतील अपुऱ्या आरोग्य सुविधा व खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे करोना अजाराव्यतरिक्त अन्य अजारांच्या रुग्णांचे नवी मुंबईत हाल होत आहेत. रुग्णांना पालिकेच्या कधी वाशी तर कधी नेरुळ येथील रुग्णालयांत हेलपाटे मारावे लागत आहेत.

नवी मुंबईत पालिकेची आरोग्य सेवा आधीच सलाइनवर आहे. त्यात करोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे पालिकेने त्यांचे वाशी येथील मुख्य रुग्णालय हे करोनासाठी स्वतंत्र रुग्णालय केले असून इतर आजाराच्या रुग्णांची ऐरोली, नेरुळ व बेलापूर येथील रुग्णालयांत व्यवस्था केली आहे. मात्र या रुग्णालयाच्या इमारती अत्याधुनिक असल्या तरी येथे अपुऱ्या आरोग्य सुविधा आहेत.

पालिकेने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील काही आरोग्य सेवा नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांत हलवण्यात आल्या आहेत. तसेच नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या रुग्णालयांत योग्य पद्धतीने आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यात खासगी क्लिनिक व नर्सिग होम बंद असल्याने करोनाव्यतिरिक्त अन्य अजारांच्या रुग्णांचे हाल होत आहेत. पालिकेने शहरातील २७ आरोग्य केंद्रांत ताप तपासणी केंद्रे सुरू केली असली तरी अपघात, हृदयरोग तसेच अन्य लहान-मोठय़ा आजारांच्या रुग्णांची परवड सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगरमधील एका रुग्णाला सातत्याने खोकल्याचा त्रास होत होता. मात्र त्याला नेरुळ व वाशी येथील पालिका रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. वाशी रुग्णालयात गेल्यानंतर नेरुळच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. नेरुळला गेल्यानंतर खोकला असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्याची वाशीच्या रुग्णालयात करोनाची तपासणी करण्यात आली.

पालिकेने नेरुळ येथील रुग्णालयात एचआयव्ही व क्षयरोग तर ऐरोली येथील रुग्णालयात फेलोसिनिया विभाग हलविण्यात आला आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयांत अतिदक्षता विभागच नसल्याने या रुग्णांवर उपचारासाठी अडचण येणार आहे.

महापौर जयवंत सुतार यांनी पालिका चांगल्या आरोग्य सेवा देण्याबाबत योग्य ती खबरदारी घेत आहे. काही अडचणी येत आहेत,परंतु नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे असे सांगितले.

वाशीचे सार्वजनिक रुग्णालय करोनासाठी स्वतंत्र रुग्णालय केले आहे. पालिकेच्या नेरुळ व ऐरोली रुग्णालयात इतर विभाग हलविण्यात आले आहेत. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातही अन्य आजारांवर उपचार करण्याची सुविधा करण्यात आली आहे. तसेच आरोग्य केंद्रांत ताप तपासणी केंद्रे सुरू आहेत. अन्य रुग्णांनाही कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inadequate facilities in navi mumbai municipal hospitals for treatment of covid 19 patients zws