नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा शुभारंभाची नवी तारीख आता पुढे येत आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी या विमानतळाचे उद्धाटन होईल अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे उद्धाटनाची तारीख देखील बदलली गेल्याचे सांगितले जाते. मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्प आणि हे विमानतळ अशा दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्धाटन येत्या आठ ॲाक्टोबर रोजी होईल अशी माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान उद्धाटनानंतरही हे विमानतळ सुरु होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या काळात या भागातून बसवाहतूक तसेच आसपासच्या मास,मच्छि तसेच मटन विक्रेत्यांवर कारवाईसाठी विशेष मोहीम आखण्याचे आदेश नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी दिले आहेत.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम हा मुंबई महानगर प्रदेशातील एक सक्षम परिवहन उपक्रम मानला जातो. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा शुभारंभ होत असताना एनएनएमटी प्रशासनाने या भागात कशाप्रकारे सुविधा देता येतील याची चाचपणी सुरु केली आहे, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सुत्रांनी लोकसत्ताला दिली.
सुरुवातीच्या टप्प्यात याठिकाणी नागरिक, प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांची नेआण करण्याकरिता किमान ५० इलेक्ट्रीक बसेस तैनात करता येतील का याची चाचपणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबई विमानतळ हे महापालिका क्षेत्राबाहेर असले तरी जेमतेम दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे महापालिका हद्दीस लागून उभ्या रहात असलेल्या या विमानतळ प्रकल्पास सोयीच्या ठरतील अशापद्धतीच्या सुविधांची आखणी महापालिकेमार्फत केली जात आहे.
पहिल्या टप्प्यात एनएमएमटी ५० हून अधिक बसेस या भागात सोडण्याचा विचार करत आहे. या विमानतळावरुन प्रत्यक्ष विमानसेवा सुरु झाल्यानंतरच त्यासंबंधीचा विचार केला जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. दक्षिण मुंबई, मुंबई अटल सेतू, दादर, चेंबूर, मानखुर्द, वाशी खाडीमार्गे विवीध बससेवा सुरु करता येतात का याची चाचपणी केली जात आहे. नवी मुंबईतील पाम बिच मार्गाच्या सक्षमीकरणाचा विचारही यानिमीत्ताने केला जात आहे, असे सुत्रांनी सांगितले.
पक्ष्यांचा धोका ?
विमानतळ धोरणानुसार खुले मटण, मासळी विक्री पक्ष्यांना आकर्षित करते. ज्यामुळे उड्डाणांना धोका निर्माण होतो. त्यामुळे आधीच बेकायदेशीर कत्तलखाने आणि उघड विक्रीविरुद्ध कारवाई केली जात आहे, अशी माहिती पनवेल महापालिकेतील सुत्रांनी दिली. त्यादृष्टीने सातत्याने पहाणी आणि सर्वेक्षण केले जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान नवी मुंबई महापालिकेनेही आपल्या भागातील मटण विक्रि दुकाने तसेच उघड्यावरील मासे विक्रिवर पायबंद घालण्यासाठी आखणी सुरु केली आहे.
नवी तारीख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्याची आखणी करण्यात आली आहे. सुरुवातीला मोदी यांनी ३० सप्टेंबर ही तारीख मुंबई दौऱ्यासाठी निश्चित केली होती. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा दौरा महत्वाचा मानला जातो. असे असताना मोदी यांच्या दौऱ्याची तारीख आता आठ नोव्हेंबर अशी निश्चित करण्यात आली असून याच दिवशी विमानतळ प्रकल्पाचे उद्धाटन होईल अशी आखणी केली जात आहे. त्यादृष्टीने विमानतळ बांधणीच्या कामाचा वेगही वाढविण्यात आला आहे, असे सुत्रांनी सांगितले.