दोघांना अटक; विक्रीसाठी अवयव जमिनीत लपविले
नवी मुंबई : बिबटय़ांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या दोघांना नवी मुंबईत गुन्हे शाखेने अटक केली असून बिबटय़ाची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी शिकारीनंतर त्याचे मांस सेवन केल्याचीही कबुली दिली असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी दिली.
ही घटना मोरबे धरण परिसरात घडली असून या प्रकरणात आणखी काही आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गणपत पालकू लोभी आणि गणपत राघू वाघ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मोरबे धरण परिसरातील मोर्बी गावालगतच्या जंगलात काही युवक बिबटय़ाची नखे, कातडी विकण्यासाठी ग्राहकांच्या शोधात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांना मिळाली होती. हा प्रकार गंभीर असल्याचे सह आयुक्त बी. जी. शेखर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तांबे व काही जणांचे पथक नेमले. यात स्वत: कोल्हटकर आणि तांबे हे दुचाकीवर मोर्बी गावापर्यंत गेले व भल्याची वाडी येथील जंगलाबाहेर दुचाकी लावून सुमारे दीड ते दोन किलोमीटर जंगलात पायी जात आरोपींच्या झोपडीवजा ठिकाणावर पोहोचले. बिबटय़ाच्या अवयवांबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींना पोलीस असल्याचा संशय आला. पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी त्या ठिकाणीच याची कबुली दिली. वन विभागाला त्या ठिकाणी पाचारण करीत कातडे, जबडा, नखे बिबटय़ाचीच असल्याची खात्री करून आरोपींना अटक केली.
महिनाभरापूर्वी शिकार
भाल्याची वाडी परिसरात एका पाणवठय़ावर बिबटय़ा येत असल्याची माहिती आरोपींसह काहींना मिळाली होती. त्यांनी त्याची शिकार करण्याचे ठरविले. बिबटय़ाला पकडणे अवघड असल्याने त्यांनी गुंगीचे औषद देण्याचे ठरविले. महिनाभरापूर्वी तो येत असलेल्या वाटेवर मांसात औषध घालून ठेवत त्यावर लक्ष ठेवले. हे मांस बिबटय़ाने खाल्ले आणि तो बेशुद्ध पडला. याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी त्याला फरफटत झोपडीत आणले. तो मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याची कातडी, नखे, जबडा काढून घेतले व मांस भाजून खाल्ले.