मामलेदार मिसळ म्हणजे ठाणे असे एक समीकरण आहे. पण ते आता बाजूला पडण्याची वेळ आली आहे. झणझणीत लाल रस्सा आणि ताजे मऊशार पाव असा बेत समोर आला की भल्याभल्यांचे जिभेवरील नियंत्रण सुटते आणि तेलाने काठोकाठ, चमचमीट मिसळीचा घास घेतला जातो. ऐरोलीत मामलेदार मिसळीचा आस्वाद मिळवून देणारा स्टॉल सुरू झाला आहे आणि ‘मिसळ संस्कृती’त येथील खवय्ये मिसळून गेले आहेत..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर, पुणे आणि ठाणे ही मिसळीसाठीची प्रसिद्ध शहरं म्हणून नावारुपास आली आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. झणझणीत अर्थात तिखट मिसळीचे अनेक प्रकार आहेत. लालबुंद, तेलाळ म्हणजेच तरी (कोल्हापुरात याला ‘कट’ म्हटले जाते.) त्यात फरसाण, वाटाण्याची, मूग आणि मटकीची उसळ टाकली जाते. याशिवाय चवीत बदल करण्यासाठी अनेक बल्लव नानाविध प्रयोग करीत असतात. तसाच प्रयोग मामलेदार मिसळीने केला. तो आता ऐरोलीत चांगलाच यशस्वी ठरला आहे. मामलेदार मिसळीने चवीचे वेगळे रूप घेतले आहे, ते तिच्या अशा वैशिष्टय़ांमुळेच.

मामलेदार मिसळ खाण्याआधी तोंडाला पाणी आणि एकदा का खायला सुरुवात केली की मग नाका डोळ्यांतून पाणी, अशी अवस्था असते. म्हणजे ती अस्सल झणझणीत असते. तिच्या अफलातून चवीमुळे जिभेवरचा हा अन्याय खवय्ये आनंदाने सहन करतात. ठाण्यात गेलं की खवय्ये येथील मामलेदार मिसळीचा शोध घेतात. गेली ६० वर्षे ठाण्यात लक्ष्मण मोरडेश्वर यांनी सुरू केलेली मिसळ त्यांचा मुलगा शिरीष मोरडेश्वर यांनी ऐरोलीत सुरू केली आहे.

‘आमची कुठेही शाखा नाही’ असे व्यापारी धोरण राबवणाऱ्या मामलेदार मिसळीच्या आता ‘फ्रॅन्चाईजी’ तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील एक शाखा ऐरोलीत आहे. गायत्री पाटील आणि उत्तम पाटील यांनी ती घेतली आहे. ऐरोलीतील मामलेदार मिसळ चा लुक बदलण्यात आला आहे. ‘कोम्बो सिस्टम’मध्ये मिसळ पावासोबत दिली जाते. मिसळीबरोबर ग्राहकांना कैरीचे पन्हे, कोकम सरबत, ताक आणि सोलकडी मिळते.

मामलेदार मिसळीच्या दुकानात खरवसही मिळतो. या ठिकाणी सकाळी नाश्त्यासाठी शिरा, उमपा पोटपूजेसाठी मिळतो. मिसळीसोबत रस्सा मिळतो. अर्थात तो पूर्णपणे मोफत असतो; मात्र काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच तो मोफत आहे. गेल्यावर्षी मामलेदार मिसळीला ऐरोलीत सुरुवात झाली. येथील औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी आणि अधिकारी वर्ग मिसळीचा मोठा चाहता आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचीही मामलेदारवर तुडुंब गर्दी असते. अर्थात मामलेदार काहींसाठी एखादे यश, प्रसंग साजरा करण्यासाठीचे ठिकाणही आहे. येत्या काही दिवसांत मामलेदार मिसळ कोपखरणे, वाशी आणि नेरुळ येथेही सुरू करण्यात येणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले.

मामलेदार मिसळ म्हणजे झणझणीत फोडणीचा तडाखा असेच स्वरूप नाही. ती चवीनुसार झणझणीत, मध्यम आणि साधीही आहे. मिसळीत वाटाण्याची उसळ आणि बटाटय़ाची भाजी टाकली जाती. याशिवाय मोठे फरसाण असते. त्यावर कांदा टाकून त्यात बारीक शेव टाकली जाते. दही मिसळ, वडा उसळही येथे मिळते. मामलेदारमध्ये ‘सेल्फ सव्‍‌र्हिस’ची पद्धत आहे. याची किंमत ६० रुपये आहे. अवघ्या काही दिवसांत ऐरोलीत मामलेदार मिसळीचा गवगवा झाला आहे.

पत्ता : मामलेदार मिसळ, ऐरोली स्थानकासमोर (प.)

वेळ : सकाळी ७ ते रात्री ९.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamledar misal at airoli