लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल : वर्षभरात एका झोपडीच्या पाठोपाठ ७० झोपड्या पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर वसाहतीलगत बेलपाडा गावाच्या मागे भारती विद्यापीठ जवळील डोंगराच्या टेकडीवर वसल्या होत्या. याच झोपडपट्टीवर पनवेल महापालिकेने तीन दिवसांपूर्वी कारवाई केली होती. पुन्हा अतिक्रमन तोडलेल्या परिसरात झोपड्या वाढू नये यासाठी पनवेल महापालिकेने सूरक्षा रक्षक तैनात केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी पालिका प्रशासक पदाचा कारभार हातात घेतल्यावर लोकसभा निवडणूकीदरम्यान आचारसंहितेच्या काळात अतिक्रमन वाढू नये यासाठी जोरदार हालचाली सूरु केल्या आहेत. खारघरसारख्या शहरात अचानक झोपड्या वाढल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून पालिकेला मिळाल्यानंतर पालिकेने त्याची गंभीर दखल घेतली. पालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रमुख उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी आणि तीन जेसीबी, डंपर, मजूर व सूरक्षा रक्षक असे ५० कर्मचा-यांचे पथक घेऊन पोलीस संरक्षणात या टेकडीवरील ७० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या.

आणखी वाचा-पनवेल : अभियंत्याची १५ लाखांची फसवणूक

सध्या या टेकडीवर पुन्हा झोपड्या बांधू नये यासाठी पालिकेने सूरक्षा रक्षक या परिसरात नेमले आहेत. पालिकेच्या अधिका-यांनी कारवाई करण्यापूर्वी संबंधित झोपडीवासियांकडे चौकशी केल्यावर धक्कादायक बाब समोर आली. नूकतेच नवी मुंबईतील सानपाडा येथील झोपड्यांवर नवी मुंबई पालिका प्रशासनाने कारवाई केल्यावर या झोपड्यांमधील रहिवाशांना कथीत झोपडपट्टी दादाने पनवेलमध्ये झोपडीवासियांना रातोरात वसविल्याचे झोपडीवासियांनी सांगीतले. वर्षभरापूर्वी बेलपाडा येथील टेकडीवर झोपड्यांची संख्या पाच होती. अचानक टेकडीवर झोपड्यांची संख्या वाढल्याने खारघरच्या रहिवाशांना संशय आला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipality keeping eye after removing the encroachment on belpada hill mrj