नवी मुंबई : वाशी येथे सिडकोच्या कार्यालयाला पावसाळ्यात गळती लागली असून मोठ्या प्रमाणात कार्यालयात पाणी साचत आहे. छत, भिंती यामधून होणाऱ्या गळतीमुळे सर्व कार्यालयीन कागदपत्रे, दस्तावेजांवर ताडपत्रीचे आवरण टाकण्याची नामुष्की ओढवली आहे. अशा वातावरणात काम करताना कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.

वाशी येथे सिडको कार्यालयाची इमारत असून या ठिकाणी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय आहे. वाशीतील सिडकोचा गाडा येथूनच हाकला जातो. सिडकोने नवी मुंबई शहर नियोजनबद्ध उभे केले असले तरी सध्या त्यांचेच कार्यालय जीर्ण अवस्थेत आहे. वाशीतील या कार्यालयात सर्व भिंतींना ओल आली असून त्यातून पाणी गळत आहे. तुटलेल्या खिडक्या, लटकते तावदान, कोंदट वास अशा वातावरणात कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. वाशी कार्यालयातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे येथे आहेत. कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांना कॅबिन देणे शक्य नसल्याने पार्टिशन करून अनेक अधिकारी कर्मचारी येथे काम करतात. असे प्लायवूड पार्टिशन देखील अत्यंत खराब झालेले असून त्यावर रेनकोट टांगण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकीकडे एवढ्या सुंदर इमारती, स्टेशन्स सिडकोने बांधले मात्र सिडकोच्याच कार्यालयाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसाळी पूर्व कामे ऐन पावसाळ्यात

इमारत जुनी असून जिन्यातील फरशी तुटलेल्या, अनेक ठिकाणी प्लास्टर पडलेले, जिन्याचे कठडे नसणे, अपुरी प्रकाश योजना, खिडक्यांची नादुरुस्त तावदाने, अशा अनेक समस्या इमारतीत आहेत. शहर निर्मिती करणाऱ्या सिडकोच्या अशाही अवस्थेत सिडको कर्मचारी मान खाली घालून काम करतात. मात्र अति खराब अवस्था झाल्यानंतर सिडकोला जाग आली आणि त्याची डागडुजी ऐन पावसाळ्यात सुरू केली. त्यामुळे केवळ म्हणायला डागडुजी सुरू आहे, मात्र पावसामुळे काम ठप्प अशी अवस्था असल्याचे येथे काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

सध्या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू आहे. लवकरच सर्व सोयींनी युक्त कार्यालय पूर्ण करण्यात येईल. – प्रिया रातांबे (जनसंपर्क अधिकारी)