Navi Mumbai International Airport Inauguration Date: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथील विमानतळाचा महत्त्वपूर्ण पर्याय प्रवाशांसाठी सुरू करण्यात येत आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी या विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, उद्घाटनाच्या तारखेत बदल असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाची नेमकी तारीख स्पष्ट झाली नसली, तरी उद्घाटनानंतर पहिल्याच दिवसापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोणत्या कंपन्यांच्या विमान सेवा सुरू होणार आहेत, हे आता स्पष्ट झालं आहे. त्यातली एक मोठी विमान कंपनी म्हणजे एअर इंडिया!

१५ शहरांसाठी विमानसेवा सुरू करणार

एअर इंडियाकडून यासंदर्भात करण्यात आलेल्या घोषणेनुसार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून एअर इंडियाची विमानसेवा सुरू होणार आहे. या विमानतळावरून १५ शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा कंपनीकडून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला दिवसाला एअर इंडियाची २० विमानं नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी वाहतुकीसाठी उड्डाण घेणार आहेत. Air India Express श्रेणीतील ही विमानं असतील.

पुढील वर्षापर्यंत विमान उड्डाणांची संख्या ४० वरून ५५ पर्यंत नेण्याचं नियोजन असल्याचं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं आहे. यामध्ये ५ आंतरराष्ट्रीय विमान सेवांचाही समावेश असेल. २०२६ च्या अखेरपर्यंत ही संख्या ६० पर्यंत वाढवण्याचाही कंपनीचा मानस आहे.

इतर कोणत्या विमान कंपन्यांची सेवा सुरू होणार?

एअर इंडियाबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणखी दोन विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली असून त्यात अकासा एअर आणि इंडिगो या विमान कंपन्यांचा समावेश आहे.

नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं प्रायव्हेट जेट

दरम्यान, नवी मुंबई विमानतळावर शनिवारी २० सप्टेंबर रोजी पहिलं प्रायव्हेट जेट उतरलं. शनिवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी हे प्रायव्हेट जेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या विमानानं प्रवाशांसह विमानतळावरून उड्डाण घेतलं. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणारी ही नवी मुंबई विमानतळावरची पहिली विमान सेवा ठरली आहे. VT-APV असं या विमानाचं नाव असून ते अहमदाबादहून निघालं होतं. या लँडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.