पालिकेकडून देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांत संताप
नवी मुंबई : पालिकेने नेरुळ येथील स्मृतिवनाकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी स्मृतिप्रीत्यर्थ लावण्यात आलेले फलक गायब आहेत, तर सर्वत्र गवत पसरले आहे. तत्कालीन आयुक्तांच्या संकल्पनेतून साकालेले हे स्मृतिवन सध्या कुलूपबंद आहे.
नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबईलगत मोकळ्या जागेत पालिकेने वर्षभरापूर्वी स्मृतिवन ही नावीन्यपूर्ण कल्पना आकाराला आणली होते. या ठिकाणी आपले कुटुंबीय, आप्तेष्ट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षलागवड करीत त्या झाडाला नामफलक लावण्यात आले होते. एक हजार रुपये आकारून पालिकेने ही वृक्षलागवड केली होती. याचे मोठे कौतुकही झाले होते. याची पालिका देखभाल करणार होती. मात्र त्याकडे करोनाकाळात दुर्लक्ष करण्यात आले आहे.
या स्मृतिवनाची दुरवस्था झाली असून सर्वत्र गवत पसरले आहे. एकाही झाडाला नामफलक राहिलेला नाही. या ठिकाणी झाडांचे वाफे दिसत आहेत. मात्र ज्या नावाने हा झाड लावले होते त्याचे काहीही अस्तित्व राहिलेले नाही. या प्रकारामुळे नागरिकांमधून पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
देखभालीकडे दुर्लक्ष
लावलेली अनेक झाडेही गायब आहेत. पुणे आणि नाशिक येथूनही काहींनी आठवणींची झाडे लावली होती. यात स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थही लावलेले झाड आता अस्तित्वात नाही. या झाडांचा तरी पालिकेने देखभाल करीत सन्मान करणे अपेक्षित होते, अशी खंत व्यक्त होत आहे.
दिवंगत आप्तेष्टांच्या नावे लावलेल्या झाडांच्या देखभालीसाठी पालिकेने १ हजार रुपये घेतले होते. त्याची देखभाल न करता पालिका प्रशासनाने नागरिकांच्या भावनांशी खेळ केला आहे. अगदी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लावलेली झाडेही पालिका वाढवू शकली नाही, हे दुर्दैवी आहे.
– समीर बागवान, परिवहन सदस्य, शिवसेना
स्मृती उद्यानाबाबत माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली जाईल व संबंधितांवर कारवाई केली जाईल.
-मनोज महाले, उपायुक्त, उद्यान विभाग