नवी मुंबई : नेरुळ सेक्टर ३० मधील महानगरपालिका शाळेच्या नव्या इमारतीचे छत भरवर्ग सुरू असताना कोसळल्याची घटना गुरुवारी घडली होती. या घटनेनंतरही मंगळवारी शाळा नियमित भरविण्यात आली, मात्र छताचे प्लास्टर ज्या वर्गात कोसळले तेथे डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान या शाळा इमारतीच्या ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सामाजिक संस्था तसेच पालक करत आहेत.
७.७५ कोटी खर्च करून ही इमारत उभी राहिली आहे. यंदा १६ जूनपासून वर्ग भरण्यास सुरुवात झाली आणि चारच दिवसात शाळेच्या एका वर्गातील छताचे प्लास्टर निखळले. वर्गातील शिक्षिकेला या दुर्घटनेत किरकोळ दुखापत झाली. घटना घडली तेव्हा वर्गात ३६ विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर शुक्रवारी प्लास्टर कोसळलेल्या ठिकाणी तात्काळ ठेकेदाराकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.
या इमारतीला पालिका अधिकाऱ्यांसह राजकीय प्रतिनिधी व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट दिली. शाळेच्या गच्चीवर असलेली अस्वच्छता दुरवस्था, साचलेले शेवाळ, तुटलेल्या पाण्याच्या टाक्या असे चित्र पाहायला मिळाले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच व निकृष्ट कामामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या शाळेला पालिका अधिकाऱ्यांनीही भेट देऊन इमारतीची पाहणी केली आहे.
सीवूड सेतील दुर्घटना घडलेल्या शाळा इमारतीची पाहणी केली असून ठेकेदाराची सखोल चौकशी करण्यात येत आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
शिरीष आरदवाड, शहर अभियंता