नवी मुंबई : शस्त्र परवाना देताना तो कुठल्या भागासाठी आहे हे स्पष्ट केले जाते. तसेच या बाबत परवाना घेणाऱ्या व्यक्तीला सांगितलेही जाते . तरीही राज्या बाहेर परवानगी नसताना अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या शस्त्रा सोबत असणारी ११ जीवंत काडतुसे हि जप्त करण्यात आली आहेत.
प्रवीणकुमार लालताप्रसाद पांडे (वय ३२ मूळ जोनपूर उत्तरप्रदेश) आणि विकास त्रिपाठी (४५) राहणार मूळ प्रतापगढ उत्तरप्रदेश. असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. प्रवीणकुमार हा सध्या उलवा येथे दूध डेअरीचा व्यवसाय करतो तर विकास त्रिपाठी हा बांधकाम व्यवसायात आहे.
११ तारखेला उलवा येथील सेक्टर २० संविधान चौकातुन जिओ कडे जाणाऱ्या मार्गिकेवर गुन्हे प्रतिबंधक पथक गस्त घालत होते. पहाटे सव्वाचारच्या सुमारास प्रवीणकुमार पांडे हे आपल्या गाडीतून जात होते. गस्त पोलीस कर्मचारी भीमराव नाईकवाडी यांनी संशयवातून गाडी थांबवली. गाडीची झडती घेतली असता त्यात एक अग्निशस्त्र आणि ११ जीवंत काडतुसे आढळून आले. याबाबत विचारणा केली असता हे शस्त्र परवाना धारक असल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे शस्त्र विकास त्रिपाठी यांच्या नावे असल्याचे समोर आले.
पोलिसांनी पुढील चौकशी साठी प्रवीणकुमार याला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केल्यावर त्याने दिलेल्या माहिती वरून विकास त्रिपाठी याला ताब्यात घेतले गेले. त्याच्याशी केलेल्या चौकशीत शस्त्र परवाना असून तो केवळ प्रवीणकुमार याच्या कडे दिले होते असे समोर आले. कागदपत्र पाहणीत शस्त्र परवाना होता मात्र वापर करण्याचा परवाना केवळ उत्तरप्रदेश राज्य असल्याने महाराष्ट्रात असे शस्त्र वापर करणे बाळगणे गुन्हा आहेच शिवाय शस्त्र केवळ परवाना धारकाने जवळ बाळगण्याचा स्पष्ट नियम असल्याने तो प्रवीण याला देणे हे गुन्हा आहे.
पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्या कडील ६ लाख रुपयांची गाडी, ९० हजार ६०० रुपयांचे अग्निशस्त्र, २१ हजार रुपयांचे ११ काडतुसे असा एकूण ६ लाख ९२ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी उत्तरप्रदेश मध्ये शस्त्र वापर परवाना असताना महाराष्ट्रात का आणले. त्यामागे काही कट आहे का ? याबाबत अधिक चौकशी सुरु आहे. अशी माहिती उलवा पोलिसांनी दिली.