नवी मुंबई : ठाणे बेलापूर मार्गावरून थेट महापे उड्डाणपूल मार्गे कोपरखैरणेत येण्यासाठी नवा उड्डाणपूल निर्माण केला जाणार आहे. यासाठी २१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पार होताच काही प्राथमिक चाचण्या करून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

ठाणे बेलापूर मार्गावर सीबीडी ते ठाणे मार्गावरून कोपरखैरणेकडे येण्यास रेल्वे स्टेशन अंडरपास हाच एकमेव मार्ग आहे. अन्यथा वळण घेऊन महापेमध्ये प्रवेश करीत उड्डाणपुलाखालून वळसा घ्यावा लागतो. मात्र वाहतूक वाढल्याने येथेही वाहतूक कोंडीची समस्याच निर्माण होत आहे. त्याच बरोबर कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

रेल्वे स्टेशन लगत दोन उतुंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. तसेच रेल्वे स्टेशन पासून जवळ असणाऱ्या सेक्टर आठ नऊ येथेही जुन्या इमारतींच्या पुनर्निमाण कामे वेगात सुरु आहेत. त्यामुळे भविष्यात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. ठाणे बेलापूर मार्गावर बेलापूर करून येत असताना कोपरखैरणेत जाण्यासाठी रेल्वे स्टेशन अंडरपासचा वापर करावा लागतो. तर ठाणे कडून बेलापूरला जाताना घणसोली नाका पासून वळण घेत किंवा महापे या दोन मार्गांचा अवलंब केला जातो. हे मार्ग बेलापूरकडून येताना वाहन चालकांचा वेळ आणि इंधन जास्त जाते.

सध्याची वाहतूक आगामी काळात वाढणारी वाहतूक लक्षात घेता ठाणे बेलापूर मार्गावर ठाणे मार्गिकेवर एका उड्डाणपूल बांधला जाणार आहे. ठाण्याच्या दिशेच्या एका मार्गिकेवर सुरू होणारा उड्डाणपूल पुढे महापे कोपरखैरणे उड्डाणपुलाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे बेलापूर ठाणे ते कोपरखैरणे सुसाट रस्ता होणार आहे.

वैशिष्ट्ये

या उड्डाणपुलाची लांबी २१२. ५ मीटर असून रुंदी ४. ५० असणार आहे या उड्डाणपुलासाठी अंदाजित खर्च २१. ८९ कोटी असणार आहे. महापे कोपरखैरणे उड्डाणपुलाला हा पूल जोड उड्डाणपूल असणार असून उड्डाणपुलावरून कोपरखैरणेच्या दिशेने जाता येणार आहे.

कोपरखैरणेतील अंतर्गत वाहतूक खास करून रेल्वे स्टेशन परिसरातील कोंडी कमी होईल. ठाणे बेलापूर मार्गावरून कोपरखैरणे सेक्टर १४ ते २२ ला विना वाहतूक कोंडी जाता येणार आहे. – शिरीष आरदवाड, शहर अभियंता

Live Updates