लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कोकणातील निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या महाविद्यालयांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले असून विद्यापीठाला आपत्कालीन निधीचा विसर पडल्याचा आरोप अधिसभा सदस्यांनी केला आहे.

जूनमध्ये कोकणाचे निसर्ग चक्रीवादळाने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. कोकणातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न १६ महाविद्यालयांना वादळाचा फटका बसला. महाविद्यालयांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिसभेच्या सदस्यांनी पाहणी केली होती. विद्यापीठाने या महाविद्यालयांना मदत देण्यासाठी समिती स्थापन केली. मात्र, अद्यापही महाविद्यालयांना मदत देण्यात आलेली नाही. ‘महाविद्यालयांची पाहणी करणाऱ्या समितीने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार लवकरच पुढील निर्णय घेण्यात येईल,’ असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, विद्यापीठाने नुकसान झालेल्या महाविद्यालयांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार नवीन महाविद्यालये, तुकडी सुरू करताना महाविद्यालयांना बँकांमध्ये ठेवी ठेवणे बंधनकारक आहे. प्रत्येक नवीन विषय किंवा तुकडीसाठी पाच लाख रुपयांची ठेव ठेवावी लागते. या रकमा महाविद्यालयाला किंवा विद्यापीठालाही वापरता येत नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत लक्षात घेऊन हा निधीही महाविद्यालयांना वापरण्यास विद्यापीठाने परवानगी द्यावी. याबाबत कुलगुरूंना पत्र लिहिले असल्याचे अधिसभा सदस्यसुधाकर तांबोळी यांनी सांगितले आहे.

आपत्कालीन निधी पडून?

गेल्या दहा वर्षांपासून विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून आपत्कालीन निधीसाठी प्रति विद्यार्थी १० रुपये तर कुलगुरू निधीसाठी २० रुपये घेते. मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे ८०० महाविद्यालयांत दरवर्षी शिक्षण घेणाऱ्या सुमारे ७ लाख विद्यार्थ्यांकडून हा निधी घेण्यात येतो. या कोटय़वधींच्या निधीचाही वापर विद्यापीठ करत नसल्याचे अधिसभा सदस्यांचे म्हणणे आहे.