नवी मुंबई : नवी मुंबई शहरात आणि एमआयडीसी भागातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्यामुळे हे रस्ते सुसाट झाले, मात्र पावसात या कामातील त्रुटी समोर आल्या आहेत. रस्त्यांच्या पातळीच्या वर पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी छिद्रे बनवली गेली आहेत, तर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यास अतिशय छोटी जागा झाली आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणी साठून राहत आहे.

नवी मुंबईलगत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा उभ्या करून देण्याचे काम नवी मुंबई महापालिकेकडे आहे. त्यामुळे गेल्या दशकभरापासून येथील रस्त्यांचे काम पालिका करीत आहे. येथील बहुतांश रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झालेले आहे. एमआयडीसी पट्ट्यात केवळ २१ किलोमीटरच्या रस्त्यांचे काम एमआयडीसी करते आहे. रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करताना पावसात पाण्याचा निचरा वेगात कसा होईल याची काळजी घेतली नसल्याचे थोड्या पावसातही दिसून येते. खासकरून तुर्भे, महापे, शिरवणे भागात थोड्या पावसाने रस्ते जलमय होत आहेत.

नवी मुंबईत आणि एमआयडीसीत डोंगरावरून जोरदार पावसाचे पाणी कोसळते. मात्र या गोष्टी लक्षात न घेता रस्त्यांची बांधणी केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांचा उतार एकीकडे आणि पाण्याचा निचरा होणारी छिद्रे दुसरीकडे अशी परिस्थिती बहुतांश ठिकाणी आहे, अशी टीका शिवसेनेचे उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी केली आहे. अशीच परिस्थिती शहरांतर्गत रस्त्यांची आहे.

पाणी तुंबण्याचे ठिकाण

वाशीत सेक्टर ९ ब्ल्यू डायमंड चौकात पावसाचे पाणी साचते म्हणून रस्ते बांधताना या भागात भराव टाकून रस्ते बांधले. मात्र येथे जमा होणारे पाणी आता आसपास जमा होत आहे. वाशी-कोपरखैरणे रस्ता, ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलाखालील भाग, सी वूड्स मॉलसमोरील भाग अशा अनेक ठिकाणी पाणी साचले जाते. तसेच वाशी-तुर्भे मार्गावरील तुर्भे येथील सेवा मार्गावरही प्रचंड पाणी साचते. पाणी साचण्याचे महत्त्वाचे कारण एकच असून पाण्याचा निचरा होणारे छिद्र एक तर छोटे, बुजलेले किंवा उंचावर असणे हे आहे, अशी माहिती मनपा सूत्रांनीच दिली आहे.

सिमेंट काँक्रीटीकरण करताना पाण्याचा निचरा लवकर होऊ शकेल अशी सोय करण्यात आलेली आहे. मात्र पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसेल तर पाहणी करून योग्य ती पावले उचलली जातील. – शिरीष आरदवाड (शहर अभियंता)