नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवंगत दि बा पाटील यांचे नाव नाही तर दिले तर विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत येत्या ६ ऑक्टोबरला भूमिपुत्रांच्या वतीने विमानतळावर एक धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत रविवारी कोपरखैरणे येथे बैठक पार पडली असून याच बैठकीत ६ ऑक्टोबरच्या मोर्चाचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
आंदोलनाची आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी रविवारी कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी सुरेश म्हात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विमानतळाचे उद्घाटन आता येत्या ८ किंवा ९ ऑक्टोबरला होण्याची शक्यता असून विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव असेल असे सूतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मात्र हा प्रस्ताव केंद्राकडे असून त्यास तीन वर्ष होत आली तरी अद्याप त्यावर निर्णय घेतला जात नाही. आणि असे असताना उद्घाटनाचा घाट घातला जात आहे .त्यामुळे केंद्राने जर उद्घाटनाआधी विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव जाहीर केले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, नाव जाहीर न करताच उद्घाटन केले तर संघर्ष अटळ आहे, असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे.