पनवेल – थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी पनवेल महापालिकेने शास्तीवर ९० टक्के सवलतीच्या जाहीर केलेल्या अभय योजनेला अजून १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अभय योजना जाहीर केल्यापासून आतापर्यंत ६० दिवसांमध्ये ८६,४९१ करदात्यांनी २८० कोटी ४१ लाख रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला. यापैकी प्रत्यक्ष अभय योजनेचा लाभ ५२,२२० करदात्यांनी घेतला.
सोमवारी (१५ सप्टेंबर) या अभय योजनेचा अंतिम दिवस असल्याने एका दिवसात ४ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा कर एका दिवसात जमा करण्यात आला. महापालिका आयुक्तांनी संबंधित अभय योजनेला अजून १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याने करदात्यांना कर भरण्यासाठीची रक्कम जमा करण्याची तजवीज करण्याची वेळ मिळणार आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात तब्बल साडेतीन लाखहून अधिक करदाते आहेत. सूमारे पावणेतीन लाख करदात्यांकडून पनवेल महापालिकेला १६०० कोटी रुपये थकीत कर जमा करणे हेच महापालिकेसमोर आव्हान आहे. यामध्ये खारघरमधील करदाते तसेच तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि कामोठे, कळंबोली, आणि तळोजा पाचनंद, नावडे येथून मोठ्या प्रमाणात थकीत कर वसुलीचे आव्हान असल्याने महापालिकेच्या कर विभागाला पुढाकार घेऊन करदात्यांची मनधरणी करावी लागणार आहे.
खारघर क्षेत्रातून ३३६ कोटी रुपयांचा थकीत कर आहे. तर तळोजा औद्योगिक वसाहतीमधून २२७ कोटी रुपयांचा कर मिळणे महापालिकेला अपेक्षित आहे. तसेच कळंबोली, रोडपाली येथील १९१ कोटी आणि तळोजा पाचनंद वसाहतीमधून १९० कोटी रुपयांचा थकीत कर आहे. कामोठे येथून १२९ कोटी आणि नवीन पनवेल, खांदाकॉलनी येथून ८४ कोटी रुपयांचा कर वसुलीसाठी महापालिकेला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
महापालिकेने जाहीर केलेल्या मालमत्ता करावरील अभय योजनेचा पहिल्या टप्यात शास्तीवरील ९० टक्के माफीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून त्यानंतर दूस-या टप्यात १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या काळात शास्तीमाफीवरील सवलत ७५ टक्के करण्यात आली आहे.
महापालिकेने मालमत्तेचे इ बीलामार्फत डीजीटल (ऑनलाईन) भरणा केल्यास २ टक्के सवलत देणार असून सौरउर्जा वापरणा-या करदात्यांसाठी अजून २ टक्के सवलती दिली आहे. जल पुनःभरणा करणा-या करदात्यांसाठी २ टक्के सवलत घनकच-याची शास्त्रोक्तपद्धतीने विल्हेवाट लावणा-या करादात्यांसाठी २ टक्के सवलत दिली जाणार असल्याने जास्तीत जास्त करदात्यांनी या योजनांची लाभ घेण्याचे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.