पनवेल : पनवेल महापालिकेने चार दिवसांपूर्वी ढोलताशांच्या गजरात महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला. राजकीय मंडळी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यात आले. परंतु चार दिवस उलटले तरी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेले नाहीत. पावसाळी रेनकोट, बूटही पालिकेने दिले नाहीत.

महापालिकेच्या ११ शाळांमध्ये पहिले ते सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. या ११ शाळांमध्ये १५०० विद्यार्थी शिकत आहेत. इतक्या कमी संख्ये असलेल्या विद्यार्थ्यांचेही नियोजन शिक्षण विभागाचे उपायुक्त करु न शकल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अजूनही गणवेश नेमका कधी मिळेल याचे खात्रीलायक उत्तर शिक्षण विभागाचे अधिकारी देऊ शकत नाहीत.

चार हजार कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहचलेल्या पनवेल महापालिकेने सुरूवातीपासून शिक्षण विभागाला प्राधान्य देणे गरजेचे समजले नाही. महापालिका पनवेल शहरापुरतेच प्राथमिक शिक्षण देत आहे. महापालिकेला आट वर्षे झाली तरी सिडको वसाहती आणि २९ गावांमध्ये पालिकेची शिक्षण गंगा कधी पोहचणार हा प्रश्न कायम आहे. यंदा महापालिकेने विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश, दोन जोड बूट, दोन जोड सॉक्स आणि एक रेनकोट यासाठी तीन हजार ते साडेतीन हजार रुपये विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचे नियोजन आखले होते. मात्र अजूनही विद्यार्थ्यांचे खातेच उघडले न गेल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. मागील वर्षी पालकांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने पालकांकडून संबंधित वस्तूच्या पावत्या जमा करताना शिक्षकांना नाकीनऊ झाले होते. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यावर त्यांना कोणत्या दूकानातून गणवेश घ्यायचा हे सांगितले जाणार आहे.

महापालिकेमध्ये १५०० विद्यार्थ्यांपैकी २०० विद्यार्थी नवीन असतील मात्र १३०० विद्यार्थी जुने आहेत. त्यामुळे महापालिका याची पूर्वतयारी का करू शकली नाही असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या खांदा येथील दोन शाळांमधील विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे काम सुरू आहे. अजूनही ९ शाळा शिल्लक आहेत. सध्या पनवेल महापालिकेतील विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर नाहीतर घरातील कपड्यांवर शाळेत यावे लागते. रेनकोट नसल्याने भिजत शाळेपर्यंत यावे लागते.

गुरुवारी महापालिकेची सर्वसाधाऱण सभेमध्ये याविषयी निधीला मान्यता देण्यात येणार होती. गुरुवारची सभा पुढे ढकलल्यामुळे नेमकी कधी सभा होणार कधी मान्यता मिळणार, कधी विद्यार्थ्यांची बॅंक खाती कधी उघडणार, विद्यार्थ्यांना मापाप्रमाणे गणवेश कधी मिळणार हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत.

लवकरच महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व इतर साहित्य दिले जाईल. शाळा सुरू झाली त्यादिवशी पुस्तक दिली आहेत. बँक खाती उघडण्याची प्रक्रिया सुरू असून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यास मान्यता घेतल्यानंतर डीबीटी प्रणालीने शालेयवस्तूंसाठी थेट रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होईल.

प्रेसनजीत कारलेकर, उपायुक्त, शिक्षण विभाग