|| सीमा भोईर
पनवेल महानगरपालिकेचे नगरविकास खात्याला पत्र
विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता येत्या ६ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याने पालिका प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. याचा परिणाम पनवेल शहरातील विकासकामांवर झाला आहे. दरम्यान या संदर्भात महापालिकेने नगरविकास खात्याला पत्रे लिहिले आहे. मात्र याविषयी त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरात पावसाळापूर्व कामे करणे गरजेचे आहे; मात्र आचारसंहिता लागू असल्याने त्या कामासंदर्भात निविदा काढू शकत नसल्याने कामांची रखडपट्टी झाली आहे. निविदा काढल्याने मतदारांवर प्रभाव पडतो. त्यामुळे आवश्यक आणि अत्यावश्यक बाबी करू शकत नसल्याने, नाले सफाई, पावसाळ्यापूर्वी सुरक्षेसाठी करण्यात येणारी वृक्षतोड तसेच इतर कामे रखडली आहेत.
विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची १९ एप्रिलपासून आचार संहिता लागू झाली. ती २९ मे रोजी संपली. मात्र त्याआधी २४ मे रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचार संहिता लागू झाली आहे. ती जवळजवळ ६ जुलैपर्यंत असून या कालावधीत पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व दुरुस्ती कामांच्या निविदा काढता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय महासभा आणि स्थायी समितीची बैठकाही घेता येणार नाहीत.
यामुळे नालेसफाई, रस्त्याची डागडुजी ही ठेकेदाराकरवी करण्यात येणारी कामे तशीच ठप्प आहेत, त्या कामासंदर्भात कोणत्याही प्रकारचे अवतरण व निविदा काढल्या जाऊ शकत नाहीत, मात्र पनवेलची स्थिती पाहता या अटी शिथिल कराव्यात म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरविकास खात्याशी पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर न मिळाल्याने पावसाळ्यात गंभीर स्थिती निर्माण होण्याची स्थिती पनवेल महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे.
एक आचारसंहिता संपली आणि तात्पुरती दुसरी लागू झाली, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारे कामे रखडली आहेत. आचार संहितेच्या काही अटी शिथिल कराव्यात यासाठी नगरविकास खात्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. – जमीर लेंगरेकर, उपयुक्त पनवेल महापालिका
- १३ अंतर्गत रस्त्यांची कामे रखडलेली आहेत.
- २२ नाल्यांची साफसफाई बाकी आहे.
- ४० च्या वर धोकादायक झाडे आहेत, त्यांची छाटणी आहे त्या मनुष्यबळात करावी लागत आहे.
- वर्षभर पालिकेच्या कामकाजासंदर्भात लागणाऱ्या वस्तूंच्या निविदा काढणे ठप्प आहे.