पनवेल – पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरनिर्मितीच्या दिशेने पनवेल महानगरपालिका दृढ पावले टाकत आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या “हरित पनवेल” मोहिमेअंतर्गत मौजे ओवे गाव फणसवाडी येथे मियावाकी पद्धतीने घनदाट हरित क्षेत्र उभारणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी सव्वा लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, या प्रकल्पाद्वारे त्याला गती मिळत आहे.
या मियावाकी हरित क्षेत्र प्रकल्पाची स्थळपाहणी मंगळवारी (ता. ४) उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांच्या हस्ते प्रतीकात्मक वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण विभागप्रमुख मनोज चव्हाण, लिपिक प्रवीण व्हलगळ तसेच कंत्राटदार संस्थेचे प्रतिनिधी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत ओवे गाव राखीव वन क्षेत्रात (कंपार्टमेंट क्र. १५३-व) एकूण ३१ हजार ५०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. बहावा, नीलमोहर, गुलमोहर, सीता अशोक, बॉटल ब्रश, पुत्रजीवी, ताम्हण अशा स्थानिक प्रजातींच्या झाडांनी येथील परिसर हिरवागार होणार आहे. आणखी सुमारे दोन हजार रोपांची लागवड सुरू असून, गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या सूचना उपायुक्त खारगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मियावाकी पद्धतीची वैशिष्ट्ये म्हणजे अल्प कालावधीत दाट जंगल तयार होणे आणि स्थानिक जैवविविधतेला चालना मिळणे. या पद्धतीने उभारण्यात येणारे हरित क्षेत्र हवेची गुणवत्ता सुधारेल, कार्बन शोषण वाढवेल, ध्वनी प्रदूषण कमी करेल तसेच पक्षी व कीटकांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण करेल.
पनवेल महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येणारा हा प्रकल्प “हरित शहर, स्वच्छ शहर” या संकल्पनेला मूर्त रूप देणारा ठरत आहे. मियावाकी जंगल निर्मिती उपक्रमामुळे केवळ परिसराचे सौंदर्य वाढणार नाही तर नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीवही बळकट होणार आहे. पनवेलच्या हरित भविष्याची ही एक अर्थपूर्ण सुरुवात ठरत आहे.
