पनवेल महापालिकेचा आज निकाल; ७८० पोलीस कर्मचारी तैनात
महिनाभर उडालेला प्रचाराचा धुरळा, मतदारांना मतदान केंद्रावर हजर करण्यासाठी करावी लागलेली धडपड यानंतर पनवेलवर कोणाचा झेंडा फडकणार, याविषयीचे कुतुहल शिगेला पोहोचले आहे. राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शुक्रवारी या प्रश्नाचे उत्तर मिळणार असल्यामुळे उमेवारांना धाकधूक आणि मतदारांना उत्सुकता आहे.
मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. पोलीस सज्ज आहेत. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील ६५० पोलीस कर्मचारी, ट्रॅकिंग फोर्स, राज्य राखीव पोलीस (एसआरपी) तैनात असणार आहेत. सहा मतमोजणी केंद्रांवर २० पोलीस निरीक्षक, १०० पोलीस उपनिरीक्षक, १ साहा. पोलीस आयुक्त आणि ६५० पोलीस कर्मचारी यांचा पहारा राहणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश निलवाड यांनी दिली.
४ टप्प्यांत मतमोजणी
मतमोजणी सकाळी १०पासून सुरू होणार आहे. यामध्ये प्रभागानुसार कमीत कमी २ ते जास्तीत जास्त ४ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचे निकाल सकाळी ११ वाजता तर अंतिम निकाल दुपारी १.३० ते २ वाजता लागणार असल्याची माहिती पालिका आयुक्त निंबाळकर यांनी दिली आहे.
मतमोजणीसाठी ५०० कर्मचारी तैनात
मतमोजणीसाठी ५०० कर्मचारी तैनात असणार आहेत. निवडणूक आयोग व पनवेल महापालिका यांच्या वतीने आज मतमोजणीबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक निकालासाठी उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण पनवेल महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर दाखवले जाणार आहेत. अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
६ ठिकाणी मतमोजणी
प्रभाग क्रमांक मतमोजणी केंद्र
१, २, ३ नावडे हायस्कूल
४, ५, ६ डी. ए. व्ही. स्कूल, खारघर
७, ८, ९, १० काळभैरव सभागृह, कळंबोली
११, १२, १३ रयत शिक्षण शाळा, कामोठे
१४, १५, १६ के. व्ही. कन्याशाळा, पनवेल
१७, १८, १९, २० विखे हायस्कूल, पनवेल